जगदीश गायकवाडच्या विरोधात महाडमध्ये मोर्चा

जगदीश गायकवाडच्या विरोधात महाडमध्ये मोर्चा

महाड: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड याने प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा महाड तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. यावेळी तमाम महाडकरांनी जगदीश गायकवाड याला महाड क्रांतीभूमीत यापुढे प्रवेश करू दिला जाणार नाही असा निर्धार केला.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, त्यांच्या आई महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सून मीराताई आंबेडकर तसेच भैयासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. यामुळे जगदीश गायकवाड यांच्या विरोधात आंबेडकरी जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चा काढून जगदीश गायकवाड याचा निषेध व्यक्त केला जात असून आज महाड मध्ये विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांनी मोर्चा काढत जगदीश गायकवाड याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या मोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून क्रांतीस्तंभ येथे नेण्यात आला. याठिकाणी जगदीश गायकवाड याच्या फोटोला उपस्थित महिलांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला. तर गायकवाड यांच्या पुतळ्याचे देखील दहन करण्यात आले.

बौद्धजन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, अखिल महाराष्ट्र बहुजन सेना, वंचित बहुजन आघाडी, आर.पी.आय आंबेडकरवादी, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी तुळशीराम जाधव गुरुजी, विनायक हाटे, विश्वनाथ सोनावणे, अशोक जाधव, सखाराम सकपाळ, योगेश कासारे, दीपक मोरे, प्रभाकर खांबे, सचिन धोत्रे, अशोक सकपाळ, रवींद्र चव्हाण आदि पदाधिकारी उपस्थित होते.

महाडमध्ये बेताल वक्तव्य

महाड क्रांतीभूमीत जगदीश गायकवाड याला पाय ठेवून दिले जाणार नाही असा इशारा यावेळी आंबेडकरी अनुयायांनी दिला. ज्या ज्या वेळी जगदीश गायकवाड महाडमध्ये आला त्या त्यावेळी त्याने बेताल वक्तव्य केले आहेत, असे विश्वनाथ सोनावणे यांनी सांगून महाडमध्ये 20 मार्च रोजी हाच माणूस ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी आहेत अशा क्रांतीस्तंभावर नाच गाणे करतो असे सांगून यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा महाडकर नागरिकांच्या वतीने विश्वनाथ सोनावणे, विनायक हाटे, प्रभाकर खांबे यांनी दिला.

 

 

First Published on: December 2, 2022 4:09 PM
Exit mobile version