मुरूड ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक, तज्ज्ञ डॉक्टर्सची वानवा

मुरूड ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक, तज्ज्ञ डॉक्टर्सची वानवा

मुरूड तालुक्यातील नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी शहरात उभारण्यात आलेल्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात उत्तम उपकरणे उपलब्ध आहेत. मात्र, या ठिकाणी कायम स्वरुपी वैद्यकीय अधिक्षक आणि तज्ज्ञ डॉक्टर्स नसल्याने येथील आरोग्यसेवा वार्‍यावरच आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयात नियुक्त करण्यात येणारे एमबीबीएस पदवीधारक डॉक्टर्स कंत्राटी पद्धतीने आरोग्य विभागामार्फत भरले जातात. त्यांचा एक किंवा दोन वर्षांचा कार्यकाळ संपला की हे डॉक्टर्स अन्यत्र निघून जातात. पुन्हा नवीन डॉक्टर्सची नेमणूक होऊन ते सेट होइपर्यंत त्यांचा असलेला कार्यकाळ संपून जातो. मुरूडला पूर्णवेळ वैद्यकीय अधिक्षक उपलब्ध नसल्याने अलिबागच्या जिल्हा रुग्णालयातील डॉ. पडोळे यांच्याकडे मुरूड ग्रामीण रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

तीन वर्षांपूर्वी येथे डॉ. बागुल हे पूर्णवेळ वैद्यकीय अधिक्षक होते. ते निवृत्त झाल्यानंतर अद्याप कोणाचीही येथे कायमस्वरूपी अधिक्षक नेमणूक झालेली नसून डॉ. पडोळे अधूनमधून मुरूडला येऊन कामकाज पाहतात. दोन्ही रुग्णालयाची आरोग्यसेवा हाताळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय कोणताही एमडी किंवा एमएस पदवीधारक डॉक्टरही या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाही. या रुग्णालयाला तीन वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जागा मंजूर आहेत. रुग्णालयातील कार्यरत डॉ. शिवानी यांचा कार्यकाळ एक जानेवारीला पूर्ण झाल्याने त्या देखील अन्यत्र गेल्या आहेत. तर येत्या १५ जानेवारीला दुसर्‍या वैद्यकीय अधिकारी डॉ.दिव्या सोनम यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर डॉ. विनय हडबे हे एकमेव वैद्यकीय अधिकारी येथे राहणार असून त्यांना कोरोना किंवा ओपीडी रुग्णांना सेवा देणे अवघड जाईल असे स्पष्ट दिसून येत आहे.

येथे येणारे डॉक्टर्स अननुभवी शिकाऊ असतात. त्यांना अनुभव येईपर्यंत त्यांचा कार्यकाळ संपून जातो. पुन्हा नवीन नेमणूक असा हा प्रकार गेले कित्येक दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयात सुरु आहे. मुरूड सारख्या डोंगरी आडवळणाच्या परंतु प्रसिध्द पर्यटन स्थळ असलेल्या तालुक्यात सुसज्ज आरोग्य सेवेची मोठी गरज आहे. परंतु निष्णात डॉक्टर्स नसल्याने येथील रुग्णांना अलिबाग, रोहा अथवा पुणे, मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी मोठा खर्च करून जावे लागते. येथे केवळ छोट्या शस्त्रक्रिया होतात. मोठ्या तर शक्यच नाही. पुणे , मुंबईपासून लांब असलेल्या मुरूड सारख्या तालुक्यात निष्णात डॉक्टर्स असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांसह जिल्ह्याच्या पालकमंत्री व खासदारांनी मुरुडच्या आरोग्यसेवेकडे विशेष बाब म्हणून लक्ष घालावे अशी माागणी करण्यात येत आहे.

सध्या ग्रामीण रुग्णालयात रंगरंगोटी आणि नूतनीकरण काम विशेष अनुदानातून सुरू आहे.केवळ इमारतींचे नूतनीकरण करून चालणार नाही.निष्णात सर्जन, भूलतज्ञ देखील २४ तास उपलब्ध होणे गरजेचे आहे.अन्यथा येथील गंभीर रुग्णांना अलिबाग, रोहा, मुंबईत नेण्याशिवाय पर्याय उरत नाही. म्हणजे औषधे, इमारती, उपकरणे असूनही निष्णात डॉक्टर्स नसल्याने वेळेवर काहीही उपयोग होत नाही.त् यामुळे येथील आरोग्य सेवा रामभरोसे बनलेली आहे.

 

First Published on: January 13, 2022 9:15 PM
Exit mobile version