अन्यथा मुख्याधिकारी हटाव, खोपोली बचाव मोहीम छेडणार, ‘आम्ही खोपोलीकर आमचं ठरलंय’ संघटनेकडून इशारा

अन्यथा मुख्याधिकारी हटाव, खोपोली बचाव मोहीम छेडणार, ‘आम्ही खोपोलीकर आमचं ठरलंय’ संघटनेकडून इशारा

अवैध बांधकामांसह विविध १५ विषयांना वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महेश काजळे यांच्या नेतृत्वाखाली ‘आम्ही खोपोलीकर आमचं ठरलंय’ संघटनेच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी खोपोली नगर परिषदेसमोर उपोषण करण्यात आले. यावेळी मागील काही महिन्यांपासून खोपोली शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. जर लवकरात लवकर प्रशासक या नात्याने मुख्याधिकारी यांनी निर्णय घेतले नाहीत, तर खोपोलीकरांच्या भल्यासाठी ‘मुख्याधिकारी हटाव, खोपोली बचाव’ मोहीम छेडण्यात येईल, असा इशारा खोपोलीकर तथा काँग्रेस शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी दिला.

अनधिकृत बांधकामाची यादी, सर्वे नंबर व विकासकांच्या नावासह त्यांची माहिती स्वतंत्ररीत्या संकेतस्थळावर तसेच वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचे दुय्यम निबंधक यांच्याकडे देण्याचा स्पष्ट उल्लेख असतानाही अद्याप त्याबाबत निर्णय नाही. खोपोलीकर पाण्याचा पुरवठा करणार्‍या शंकर मंदिर तलावात सेफ्टिक टँकचे जे पाणी येत आहे त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात, खोपोली नगर परिषद हद्दीतीतील दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या कामाची सखोल चौकशी करून ठेकेदारांचे बिल न काढता पुन्हा त्याच वर्क ऑर्डरवर त्याच पैशातून संपूर्ण काम दर्जेदार करून घेण्यात यावे,दुरावस्था झालेल्या नाट्यगृहाची तात्काळ दुरुस्ती व सुधारणा करून नाट्यप्रयोग, सभा व इतर कामासाठी ते उपयोगात आणावे, खोपोली नगर परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये कंत्राटी, करारनामा बेसेसवर डॉक्टर तसेच बाहेरून येणारे व्हिजींटग डॉक्टर, एक्स-रे (X-ray) मशीन, मनुष्यबळ पुरवठा (सिस्टर, कमाऊंटर, वॉर्ड बॉय व इतर) यासंबंधी व इतर जे जे वेगवेगळे ठराव, करारनामा, वर्क ऑर्डर आहेत त्याची माहिती अवलोकन प्रत देण्यात यावी, खोपोली नगर परिषद हॉस्पिटलमध्ये सोयी सुविधा व इतर हॉस्पिटल तसेच मदत करणार्‍या संस्था यांची माहिती फलकावर लावावी, शहरातील अनेक भागात धनदांडग्यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामांना बेकायदेशीर बांधकाम शास्ती लावावी, खालची खोपोली येथे नगरपरिषद जागेत भाडेतत्त्वावर दिलेल्या एस्सार पेट्रोल पंपाबाबत करारनामा तसेच किती भाडे जमा झाले ह्याची माहिती उपलब्ध करावी यासह विविध मागण्यांसाठी ‘आम्ही खोपोलीकर आमचं ठरलंय’ या संघटनेच्या वतीने सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी खोपोली नगर परिषदेसमोर आमरण उपोषण केले.

या उपोषणाला काँग्रेस, भाजपसह खोपोलीकरांचा मोठा पाठिंबा मिळाला. खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे ‘लोकशाही दिना’त सहभागी होण्यासाठी मुंबईला गेल्याने त्यांच्यावतीने आंदोलकांची नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक गणेश साळवी व उप मुख्याधिकारी गौतम भगळे यांनी भेट घेतली. त्यांनी २० फेब्रुवारीपर्यंत सर्वच विषयांबाबत सखोल माहिती देवून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर महेश काजळे व टीमने उषोषण मागे घेतले.आम्ही खोपोलीकर आमचं ठरलंय, संघटनेच्या वतीने विविध निवेदने देण्यात आली आहेत. २० तारखेपर्यंत मागण्यांबाबत लेखी स्वरूपात माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन कार्यालय अधीक्षक गणेश साळवी यांनी दिली. ते म्हणाले की, मुख्याधिकारी अनुप दुरे लोकशाही दिनानिमित्त मंत्रालयात गेल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. आज आंदोलकांसोबत झालेली चर्चा त्यांच्यापर्यंत पोहचवू. तसेच कारवाईचा अधिकारही त्यांना आहे, असे साळवी यांनी सांगितले.

खोपोली शहरात बाप नगरसेवक तर बेटा ठेकेदार असल्याने शहरातील विकासकामांचा दर्जा घसरून मागील काही महिन्यांपासून खोपोली शहराच्या विकासाला खिळ बसली आहे. जर लवकरात लवकर प्रशासक या नात्याने मुख्याधिकारी यांनी निर्णय घेतले नाहीत, तर खोपोलीकरांच्या भल्यासाठी ‘मुख्याधिकारी हटाव, खोपोली बचाव’ मोहीम छेडण्यात येईल.
– रिचर्ड जॉन, काँग्रेस शहर अध्यक्ष , खोपोली

 

First Published on: February 14, 2022 9:20 PM
Exit mobile version