किल्ले रायगडावर १५, १६ एप्रिल रोजी शिवपुण्यतिथी अभिवादन

किल्ले रायगडावर १५, १६ एप्रिल रोजी शिवपुण्यतिथी अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांची १६ एप्रिल रोजी ३४२ वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवार १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता राजदरबारात सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांच्या मुलाखती व शाहिरी कार्यक्रम ही रात्र शाहिरांची तसेच रात्री १० वाजता श्री जगदिश्वर मंदिरात हरिजागर शनिवार १६ एप्रिलला पहाटे ५ वाजता श्री जगदिश्वर पूजा, ६ वा. श्री हनुमान जन्मोत्सव, सकाळी ८. वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा, सकाळी ९ वा. राजदरबार येथे श्री शिव प्रतिमा पूजन, छत्रपती शिवरायांना आदरांजली, ११ वा. छत्रपतींच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक राजदरबार ते शिवसमाधी, दुपारी १२.३० वा. छत्रपतींना मानवंदना त्यानंतर शिवभक्तांना महाप्रसादाचे वितरण, असे कार्यक्रम होणार आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिव पुण्यस्मृती पुरस्कार या मुख्य पुरस्काराने भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच अति विशिष्ट सेवा मेडल व परम विशिष्ट सेवा मेडल प्राप्त व्हाईस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार, नरवीर तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांचे वंशज मालुसरे घराणे यांचादेखील विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

आतापर्यंत किल्ले रायगडावरील शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमात अनेक थोर व्यक्तींनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. तरी छत्रपतींना आदरांजली वाहण्याकरिता या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघूजीराजे आंग्रे, सरकार्यवाहक पांडूरंग बलकवडे, कार्यवाह सुधीर थोरात आणि स्थानिक उत्सव समिती, महाडचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम यांनी केले आहे.

First Published on: April 7, 2022 8:37 PM
Exit mobile version