श्री धाविर महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात साजरा

 

रोहे: जिल्ह्याचे श्रध्दास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज यांच्या पालखी सोहळ्यास गुरूवारी पहाटे मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर आणि पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. सलामी सोहळाप्रसंगी लोकप्रतिनिधींसह अन्य मान्यवर आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सलामी सोहळा पाहण्यासाठी भल्या पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती, यावेळी खासदार सुनिल तटकरे, वरदा तटकरे, आमदार अदिती तटकरे तसेच अनिकेत तटकरे, तहसिलदार कविता जाधव, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश कोळी, कार्यवाह भुषण भादेकर, मधुकर पाटील, विनोद पाशिलकार, समीर शेडगे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोड़े, लालताप्रसाद कुशवाह, विश्वस्त नितिन परब, समिर सकपाळ, आनंद कुलकर्णी, महेश सरदार, संदीप सरफळे, आप्पा देशमुख, हेमंत कांबळे, सुशिल शिंदे, अमित उकडे, राजेश काफरे, शैलेश रावकर आदींसह ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रसन्न आणि धार्मिक वातावरण
श्री धाविर महाराजांचा पालखी सोहळा निमित्त मंदिराचा संपूर्ण परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले होता. पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळ्यांनी वातावरण प्रसन्न आणि धार्मिक झाले होते. भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती झाली. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर महाराजांची पालखी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मार्गस्थ झाली.

थंड पेये आणि अल्पोपहाराची व्यवस्था
शहरातील ठरलेल्या मार्गावर विविध ठिकाणी ग्रामस्थांना दर्शन देत पालखी दुसर्‍या दिवशी सकाळी मंदिरात परतते. यावेळी पुन्हा महाराजांना पोलिस मनवंदना देण्यात येते. पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकाणी फुलांनी आणि सडारांगोळयांनी बहरलेले रस्ते, विशेषत: रात्रीच्या वेळी करण्यात येत असलेली रोषणाई या सोहळ्याला एक वेगळे रूप प्राप्त करून देते. रोह्यात पालखीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक मंडळांमार्फत थंड पेये आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते.

First Published on: October 6, 2022 9:58 PM
Exit mobile version