उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड

उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड

दक्षिण रायगड जिल्ह्यातील तालुक्यांना सोयीचे ठरणार्‍या येथील शासकीय उप जिल्हा रुग्णालयात पुरेशा सोयी ’सुविधांअभावी रुग्णांची हेळसांड होत असून, याबाबत वारंवार तक्रारी होऊनही दुर्लक्ष केले जात आहे. रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर कठोर पावले उचलण्याचा इशारा समाजसेवक वैभव साबळे यांनी दिला आहे.किरकोळ आजारांप्रमाणे प्रसुती, अपघात अशा वेगवेगळ्या कारणास्तव रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी असते. २८ जानेवारी रोजी प्रसुतीसाठी आलेल्या रुग्णाला शस्त्रक्रियात्मक प्रसुती (सीझर) येथे होणार नाही, अलिबागला किंवा खासगी रुग्णालयात जा असे सांगण्यात आले. यामुळे अशासारख्या घटनांमध्ये प्रसुती होईपर्यंत सर्वांचाच जीव टांगणीला लागून राहतो. प्रसुतीप्रमाणे अपघातग्रस्तांनाही इतरत्र हलविण्यास सांगितले जाते. माणगावपासून अलिबाग ९० किलोमीटर, तर मुंबईला जाण्यास जवळपास ५ तास वेळ लागतो. या दरम्यान अपघाताचे कित्येक रुग्ण दगावतात.

या रुग्णालयातील काही डॉक्टरांचे एनआरएचएममधील मागील मानधन देखील देण्यात आलेले नाही. खेडेगाव आणि आजूबाजूच्या तालुक्यातून येणार्‍या रुग्णांची संख्या दररोज १५० ते २०० असते. हे रुग्णालय १०० खाटांचे असून, तातडीचे उपचार मिळत नसल्याने ते असून नसल्यासारखे झाले आहे. रुग्णालयात आहार, स्वच्छता, धुलाई, रुग्णवाहिका या सर्व सेवा कित्येक वर्षांपासून कंत्राटी स्वरुपात आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कंत्राटदार वेगळा असून, या रुग्णालयात सेवा देणारा कंत्राटदार वेगळा आहे.

या रुग्णालयात अल्पशा वेतनात काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांना देखील काही महिन्यांपूर्वी काढण्यात आले असून, बाहेरचे कर्मचारी आणले आहेत. १२-१५ वर्षे काम करणार्‍या कंत्राटी कामगारांना काढून रुग्णासोबत येथील स्थानिक कंत्राटी कामगारांची सुद्धा पिळवणूक केली जाते. मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, उप जिल्हा रुग्णालयात सीझर होत नाही. तसेच अनेक सुविधा अपुरर्‍या असल्याचेही त्यांनी कबूल केले. याबाबत लवकरच आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे साबळे यांनी सांगितले.

हेही वाचा –

“शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार”

First Published on: January 30, 2021 4:08 PM
Exit mobile version