उल्हास नदीला प्रदुषणाचा विळखा

उल्हास नदीला प्रदुषणाचा विळखा

मावळच्या डोंगर रांगांत उगम पावलेली उल्हास नदी शहरातून मार्गक्रमण करीत नेरळ, वांगणी, बदलापूर आणि त्यानंतर पुढे कल्याणच्या खाडीला जाऊन मिळते. ही नदी मार्गातील अनेक गावांची तहान भागवत असताना गेल्या काही वर्षांत तिचे प्रदूषण झाले असून, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबत कोणतेच ठोस पाऊल उचलत नसल्याने जनतेत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उल्हास नदी पत्रातील वाढत्या प्रदुषणाची दखल घेत आम्ही मित्रमंडळींनी दोन वर्षांपासून नदी निर्मल जल अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून पात्रातील कचर्‍यासह जलपर्णी दूर केली जाते. नागरिकांमध्येही जनजागृती केली जाते. परंतु प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने नगर परिषदेने शहरातील नाल्यांद्वारे नदी पात्रात सोडण्यात येणारे पाणी प्रक्रिया करूनच सोडावे.
– समीर सोहोनी, सदस्य, उल्हास नदी निर्मल जल अभियान

नदीला खेटून मोठ्या इमारत बांधकामाचे पेव फुटले असून, तेथील सर्व मैलामिश्रित सांडपाणी थेट नदी पात्रात सोडले जात आहे. तसेच काही नागरिकही नदी पात्रात रात्रीच्या वेळी कचरा फेकत आहेत. यामध्ये कधी-कधी तर मेलेली कुत्री आणि अन्य प्राणीही आढळून आले आहेत. नदीचे शहरातून पुढे मार्गक्रमण होत असताना काही रिसॉर्ट मालकांनी नदी पात्रात बेकायदा बांधकाम केले आहे. त्याचेही सांडपाणी पात्रात सोडले जात आहे. तसेच शहरातील सांडपाणी वाहून नेणारा मुख्य नाला याच नदीला जोडला गेलेला आहे. मात्र हे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न होता थेट नदीत मिसळत असल्यामुळे जलप्रदूषण होत आहे.

नदीच्या काठावर काही ग्रामपंचातींचे डम्पिंग ग्राऊंड आहे. पावसाळ्यात पाण्याबरोबर हा कचरा नदी पात्रात येत असतो. त्यामुळे प्रदूुषणाची समस्या अधिक गंभीर बनली आहे. खेदाची बाब म्हणजे या नदीच्या पाण्यावर अनेक गावांच्या पाणी योजना असताना तेथील जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे. नदीच्या पाण्यावर लगतच शेतकरी मळे फुलवत आहे. त्यांच्यासाठी ही नदी संजीवनी आहे. अशा या नदीची प्रदुषणातून मुक्तता केव्हा होणार, याची सर्वांनाच चिंता आहे.

काय करावा उपाय?

उल्हास नदीचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी पात्रात नगर परिषदेच्या मुख्य नाल्यातून जे सांडपाणी सोडण्यात येते त्यावर प्रक्रिया करावी आणि त्यानंतर पाणी सोडावे. तसेच ग्रामीण भागातून मार्गक्रमण करताना नदी लगतचे असलेले डम्पिंग ग्राऊंड दुसरीकडे स्थलांतरित करावे. नदी पात्रातील वाढत्या जलपर्णीच्या विळखा रोखण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने उल्हास नदी प्रदूषण मुक्तीसाठी ठोस पावले उचलावीत.

हेही वाचा –

किरीट सोमय्या यांची सरनाईक, ठाकरे सरकार विरोधात लोकायुक्तांकडे याचिका

First Published on: February 9, 2021 6:05 PM
Exit mobile version