रेल्वे ब्लास्टिंग प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई; जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा इशारा

रेल्वे ब्लास्टिंग प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई; जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा इशारा

खोपोली: पनवेल कर्जत रेल्वेच्या दुसर्‍या मार्गाचे काम करताना ठेकेदारांनी निष्काळजीपणे केलेल्या ब्लास्टिंगमुळे किरवली गावातील सचिन महादू बडेकर आणि देवका महादु बडेकर या मायलेकाला प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईचा इशारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.
कर्जत- चौक रस्त्यापासून साधारण वीस मीटर अंतरावर ब्लास्टिंग करताना कोणतीच काळजी न घेता आणि मार्गावरील वाहतूक विशिष्ट अंतरावर न थांबवता ब्लास्टिंग केल्याने निष्पाप मायलेकाला जीव गमवावा लागला असल्याचे स्पष्ट होत आहे. ब्लास्टिंगमुळे ७ बाईकस्वार गंभीर जखमी झाले होते तरब्लास्टिंगमध्ये उडालेले दगड रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर आल्याने दुकानदार देखील जखमी झाले असून दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेत मायलेकाचा मृत्यू झाल्यानंतर खालापूर – कर्जत परिसरातील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. जवळपास दोन तास वाहतूक रोकून धरण्यात आली होती.

या प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दिली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा घार्गे यांनी दिला आहे. कोणालाही पाठीशी घालणार नाही असेही पोलीस अधिक्षकांनी म्हटले असून अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूरचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले आहे.

First Published on: December 27, 2022 9:46 PM
Exit mobile version