मुरूडच्या समुद्रात अडकलेल्या १० खलाशांना वाचवण्यात यश

मुरूडच्या समुद्रात अडकलेल्या १० खलाशांना वाचवण्यात यश

मुसळधार पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे मुरूडच्या समुद्रकिनार्‍यापासून ३ किमी आत वाहून आलेल्या गुजरातच्या बोटीतील १० खलाशांना वाचवण्यात भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना बुधवारी यश आले. गुजरातच्या समुद्रातून ९ ऑगस्टच्या रात्रीपासून मच्छीमारांची ही बोट भरकटली होती.

मासेमारी करीत असताना या बोटीच्या पंख्याचा रॉड अचानक तुटला. त्यामुळे ही बोट समुद्राच्या लाटांवर हेलकावे घेत बुधवारी सकाळी मोरे गावाजवळील समुद्रात आली. या बोटीत सुमारे १० खलाशी होते. भारतीय तटरक्षक दलाला याबाबतची माहिती मिळताच तटरक्षक दलाने मोहीम राबवत सर्व खलाशांना खवळलेल्या समुद्रातून सुखरूपपणे बाहेर काढले.

मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा असूनही गुजरातमधील मच्छीमार हरेश्वरी नावाच्या बोटीतून मासेमारी करीत होते. ९ ऑगस्ट रोजी मासेमारी करीत असताना या बोटीच्या पंख्याचा रॉड तुटल्याने मच्छीमारांचे बोटीवरील नियंत्रण सुटले. तोपर्यंत ही बोट मुरूडपर्यंत आली होती.

खलाशांनी समुद्रात नांगर टाकून आपल्या मालकांना फोन केला. त्यानंतर बोट मालकाने संबंधित जिल्हाधिकारी, तटरक्षक दलाचे अधिकारी, जिल्हा पोलीस यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आग्रीम नाची बोट मागविण्यात आली, परंतु त्या बोटीजवळ जाऊन खलाशांना वाचवण्यात यश येत नव्हते. अखेर या सर्व खलाशांना हेलिकॉप्टरच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. या सर्वांची मुरूड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

First Published on: August 11, 2022 5:20 AM
Exit mobile version