किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी

महाड: किल्ले रायगडावर दिनांक २ जून आणि ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे ३५० वे वर्ष असल्याने राज्याभिषेक सोहळा भव्य स्वरूपात साजरा होत आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल होण्याचे संकेत आहेत. यामुळे प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली असली तरी गडावरील गर्दीची मर्यादा लक्षात घेतली पाहिजे असा सूचक सल्ला देखील राज्याभिषेक सोहळा समितीना दिल्याचे समजते. सलग सात दिवस साजऱ्या होणाऱ्या सोहळ्यामुळे प्रशासनावर देखील प्रचंड ताण निर्माण झाला आहे. गेली महिनाभर याबाबत आढावा बैठका आणि गडावरील सोयीसुविधा याबाबत पाहणी दौरे होत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर गेली कांही वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे अशा दोन सोहळ्याचे आयोजन केले जाते. सहा जून रोजी तारखेप्रमाणे प्रतिवर्षी शिवराज्याभिषेक दिन उत्सव सोहळा साजरा होतो. यावर्षी देखील या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष असल्याने त्याची जय्यत तयारी गेली वर्षभर पासून सुरु आहे. याकरिता प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. दोन जून रोजी तिथीप्रमाणे तर सहा जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा असल्याने सलग सात दिवस किल्ले रायगडावर गर्दी राहणार आहे. दोन जून आणि सहा जून या दोन्ही दिवशी गडावर लाखोंच्या संख्येने शिवभक्तानी दाखल होण्याचे आवाहन यापूर्वी शिवराज्याभिषेक समित्यांनी केले आहे. त्यानुसार गडावर मोठी गर्दी होईल असा अंदाज आहे.

मुळातच शिवकाळात ५००० शिवबंदी क्षमता असलेल्या रायगडावर लाखो शिवभक्तांनी गर्दी केल्यास त्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि इतर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. गडावर संवर्धनाची कामे देखील सुरू आहेत. अद्याप पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेल्या नाहीत. शिवाय शौचालयांची कामे देखील अर्धवट आहेत अशा परिस्थितीत लाखो शिवभक्त दाखल झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. प्रशासनाने गेली सहा महिने आढावा बैठकांचा पाऊस पडला पडला आहे. या आढावा बैठकांमधून वीज पुरवठा, मंडप, गर्दी व्यवस्थापन, अग्निशमन, वैद्यकीय व्यवस्थापन, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, परिवहन व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्थापन, रोप वे व्यवस्थापन, आदींबाबत चर्चा केली जात आहे. गडावर ये जा करण्यासाठी असलेला पायरीमार्ग अरुंद असल्याने याठिकाणी देखील काळजी घेण्याची गरज आहे. तर रायगड रोपवे ला देखील एक जून पासूनच गर्दी होणार असल्याने याठिकाणी देखील खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

लाखो शिवभक्त दाखल होणार

किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अनेक क्षेत्रातील दिग्गज येणार असल्याने गडावर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो शिवभक्त दाखल होणार आहेत. शिवभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासन गेली अनेक दिवस जय्य्त तयारी करत आहे. याकरिता किल्ले रायगडावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे, आढावा बैठका सातत्याने होत आहेत. यामुळे महाड मधील सर्वच प्रशासकीय अधिकारी गेली महिनाभर या तयारीमध्ये गुंतले आहेत. यामुळे महाडमधील सर्वसामान्य लोकांची कामे ठप्प झाली आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना अनेकवेळा अधिकारी उपस्थित नसल्याने परत फिरावे लागत आहे.

 

First Published on: May 22, 2023 9:16 PM
Exit mobile version