बाणकोट पूल ‘नांगर’ टाकून उभा आहे!

बाणकोट पूल ‘नांगर’ टाकून उभा आहे!

कोकणचे भाग्यविधात माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी रेवस ते रेड्डी मार्गाचे स्वप्न पाहिले खरे, मात्र अद्याप तरी हे स्वप्नच असून, या मार्गातील महत्त्वाचा टप्पा असलेला रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणार्‍या बाणकोट खाडीवरील पुलाची अवस्था समुद्रात नांगर टाकून असलेल्या जहाजासारखी आहे. आठ वर्षे झाली तरी २०१६ पर्यंत काम अपेक्षित असताना जेमतेम ५० टक्के काम झाले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेत असताना तत्कालीन मंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत २०१३ मध्ये या पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्वपूर्ण पूल असल्याने तीन वर्षांत त्याचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. पुलाची लांबी १३०० मीटर आणि रूंदी १२.५० मीटर इतकी आहे. वांद्रे-वरळी सी लिंकप्रमाणे केबल स्टेप्रमाणे मध्यवर्ती बांधकाम केले जाणार असल्यामुळे पर्यटकांसाठीदेखील हा पूल आकर्षण ठरणार आहे.

२०० कोटी रुपये इतका निधी या पुलासाठी मंजूर होता. पैकी १२७ कोटी ५३ लाख रुपये ठेकेदाराला देण्यात आले आहेत. मात्र पुलाचे बरेचसे काम अजून होणे बाकी आहे. बाणकोट खाडीत उभारलेले पिलर पाण्यात गंजत आहेत. २०१८ पासून पुलाचे काम पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील लोकांना जाण्या-येण्यासाठी फेरीबोटचा आधार घ्यावा लागत आहे. सागरी सेतू प्रकल्पांतर्गत होणारा हा पूल पर्यटनाच्या दृष्टीनेही मैलाचा दगड ठरणारा आहे. प्रत्यक्षात आठ वर्षे झाली तरी या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही.

रेवस ते रेड्डी या सागरी महामार्ग अव्याहत वाहतूक असणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाला प्रभावी पर्यायी मार्ग ठरू शकतो. दोन वेळा या पुलाच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली असली तरी ते पूर्ण झालेले नाही. दुसरीकडे मागील दोन वर्षांत हे काम पूर्णपणे ठप्प असून काम करणार्‍या सुप्रीम इन्फ्राझोन कंपनीने तेथून गाशा गुंडाळला आहे. कामाची रखडपट्टी करणार्‍या या कंपनीवर कारवाई करून तिला ब्लॅकलिस्ट करावे, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी यापूर्वीच केली आहे. नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी या पुलाबाबत प्रश्न विधान परिषदेत विचारला होता. ठेकेदाराच्या आर्थिक अडचणीमुळे या पुलाचे काम संथगतीने सुरू होते. २०१८ पासून ते पूर्णपणे बंद असल्याची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली होती.

हेही वाचा –

सहा जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ५ एप्रिलला प्रारुप मतदार याद्या

First Published on: March 18, 2021 8:27 PM
Exit mobile version