विहिरी आटल्याने दासगाववासीयांची पाण्यासाठी वणवण

विहिरी आटल्याने दासगाववासीयांची पाण्यासाठी वणवण

महाड: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दासगाव गावातील विहिरींनी तळ गाठला आहे तर ज्या धरणाच्या पाण्यावर नळ पाणी पुरवठा योजना सुरू आहे, त्या धरणाचे पाणीही कमी झाल्यामुळे नळ पाणी पुरवठा योजना बंद पडली आहे. यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने दासगाववासीयांना पिण्याच्या पाण्याचा कोणताच मार्ग उरला नसल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.
ग्राम पंचायतीच्यावतीने एक आणि पंचायत समितीच्यावतीने एक अशा दोन टँकरद्वारे दिवसाला ५ ते ६ फेर्‍या पाणी पुरवठा सुरू आहे. दासगावमध्ये १२ वाड्या आहेत.जवळ पास ४००० हजार लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्राम पंचायतमार्फत तसेच पंचायत समितीमार्फत या गावासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.या लोकसंख्येला होणारा पाणी पुरवठा हा कमी पडत आहे .प्रत्येक वाडीवर दोन दिवस आड करून पाणी पुरवठा केला जात आहे. न्हावी कोंड आणि बामणे कोंड या दोन ठिकाणी टँकर रस्त्यांच्या अडचणी मुळे जात नसल्याने त्या ठिकाणच्या विहिरी मध्ये पाणी सोडले जात आहे आणि इतर वाड्यांवर घरपोच टँकरद्वारे पाणी केले जात आहे.

खासगी टँकरने पाणी खरेदी
दासगावमध्ये ग्रामपंचायत आणि खाजगी अशा मिळून एकूण १२ विहीरी आहेत. गेली २७ वर्षांपासून कोतुर्डे धरणाच्या पाण्यावरून नळ पाणी पुरवठा योजना सुरू आहे. काही दिवसांपासून दासगावमधील सर्व विहिरी आटल्या आणि या धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेली असल्याने नळ पाणी पुरवठा योजना ठप्प झाली आहे. दासगावमध्ये कोणताच पिण्याच्या पाण्याचा मार्ग उरलेला नसल्याने प्रत्येक नागरिकाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक जण खासगी टँकरने पाणी विकत घेत आहेत.

First Published on: May 26, 2023 4:03 PM
Exit mobile version