ढोकशेत धरण क्षेत्रात अनधिकृत उत्खनन, भराव; महसूल विभागाकडून २ कोटी ३६ लाखांचा दंड

ढोकशेत धरण क्षेत्रात अनधिकृत उत्खनन, भराव; महसूल विभागाकडून २ कोटी ३६ लाखांचा दंड

सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरण क्षेत्रात एका खाजगी विकासकाने अनधिकृत उत्खनन व बांधकाम केले आहे. तसेच धरणामध्ये भराव देखील केला आहे. यामुळे धरणातील पाणी जाण्याचा मार्ग देखील बंद झाला आहे. यासंदर्भात सुधागड पाली महसूल विभागाने विकासकावर २ कोटी ३६लाख ६४ हजार ६२० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर पाटबंधारे विभागाने देखील धरणात केलेला भराव काढण्यासाठी नोटीस बजावली आहे.

धरण क्षेत्रातील अनधिकृत उत्खनन, भराव व बांधकामाविषयी सामाजिक कार्यकर्ते सागर मिसाळ यांनी सुधागड महसूल विभाग व पाटबंधारे विभाग कोलाड येथे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ही कारवाई झाली आहे. सागर मिसाळ यांनी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले की, ढोकशेत गट सर्व्हे नंबर ४३२ मध्ये शेत घर बांधण्याचे काम सुरू असून सपाटीकरणाच्या नावाखाली अनधिकृत उत्खनन करण्यात आले आहे. ही जागा ढोकशेत धरणाला लागून असल्याने ढोकशेत धरणामध्ये अनधिकृतरित्या भराव करण्यात आला आहे. तसेच धरणामधून बाहेर जाणार पाण्याचा प्रवाह देखील मातीचा भराव करून बुजवण्यात आला आहे व कच्चा मार्ग करण्यात आला आहे.

ही जागा पाटबंधारे विभाग यांच्या अधिकाराखाली असताना तेथे अशा प्रकारे अनधिकृत भराव होत असूनही पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांकडून येथे पाहणी करण्यात यावी. तसेच काही ठिकाणी वृक्ष तोड झाल्याने वन विभागाने देखील येथे लक्ष द्यावे. या अनधिकृत उत्खलनासाठी महसूल विभागाने जवळपास २ कोटी ३६ लाख रुपये दंडाची नोटीस पाठवली आहे. मात्र, सुधागड महसूल विभागाच्या माध्यमातून किती दंड वसुली झाली याचीही चौकशी व तपासणी करण्याची विनंती निवेदनात केली आहे.

ढोकशेत येथे एका विकासकाने महसूल विभागाची कोणतीच परवानगी न घेता अनधिकृतरित्या उत्खनन व भरावाचे काम केले आहे. या ठिकाणी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. याबाबत सुधागड महसूल विभागाने त्यांना २ कोटी ३६ लाख ६४ हजार ६२० रुपये दंड ठोठावला आहे.
– दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड

धरण क्षेत्रात अवैधरित्या केलेला भराव काढून टाकण्याची नोटीस विकासकाला बजावली आहे. महसूल विभागाने येथे कोणतेही काम न करण्याची नोटीस बजावल्याने विकासकाला भराव काढण्यासाठी यंत्रसामग्री नेता येत नाही आहे. त्यामुळे भराव काढण्याचे काम थांबले आहे.
– रामदास सुपे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग कोलाड

महसूल विभागाने दंड आकारून तसेत काम बंद करण्याची नोटीस देऊनही उत्खनन सुरू आहे. तसेच ढोकशेत धरणाचा पाणी जाण्याचा मार्ग बंद करून काम सुरूच आहे. पाटबंधारे विभागाकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे.
– सागर मिसाळ, तक्रारदार

First Published on: February 16, 2022 8:04 PM
Exit mobile version