शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास ज्योतिरादित्य सिंधिया यांची उपस्थिती

शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास ज्योतिरादित्य सिंधिया यांची उपस्थिती

छत्रपती शिवाजी महाराज यांची १६ एप्रिल रोजी ३४२ वी पुण्यतिथी होत आहे. या निमित्ताने किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अनुषंगाने १५ आणि १६ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवारी १६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता श्री जगदिश्वर पूजा, सकाळी ६ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव, सकाळी ८ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा, सकाळी ९ वाजता राजदरबार येथे श्री शिव प्रतिमा पूजन, छत्रपती शिवरायांना आदरांजली, ११ वाजता छत्रपतींच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक राजदरबार ते श्री शिवसमाधी, दुपारी १२.३० वाजता छत्रपतींना मानवंदना त्यानंतर शिवभक्तांना महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.

१२७ वर्षानंतर मालुसरे परिवाराचा सन्मान
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अति विशिष्ट सेवा मेडल आणि परम विशिष्ट सेवा मेडल प्राप्त व्हाईस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार, नरवीर तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे यांचे वंशज समस्त मालुसरे घराणे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. १२७ वर्षापूर्वी २५ एप्रिल १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे आणि येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची नोंद त्यावेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक दप्तरात करण्यात आली आहे. असिम त्यागाच्या इतिहासाची परंपरा लाभलेला मालुसरे परिवार पुन्हा एकदा या सुवर्ण क्षणाला सामोरा जात आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी साखर, एरंडवाडी, सातारा जिल्ह्यातील गोडोली, फुरुस, पारगड, पारमाची, किवे, आंबेशिवथर, लव्हेरी, जामगाव मुळशी, जळगाव, धुळे, बारामती, कासुर्डी गुमा (भोर), शिवथर, निगडे (भोर), हिर्डोशी अशा महाराष्ट्रातील ७० गावांतील मालुसरे परिवारातील ज्येष्ठ मान्यवर व्यक्ती आणि तरुण सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

First Published on: April 15, 2022 9:05 PM
Exit mobile version