कलोते धरणाच्या उपनदीतून पाणी चोरी, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कलोते धरणाच्या उपनदीतून पाणी चोरी, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

खालापूर तालुक्यात तबेला, फार्महाऊस, घरगुती वापरासाठी नदीच्या पात्रात मोटर पंप लावून पाणी चोरी केली जात असल्याचे आढळून आले आहे. मात्र, याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे.

खालापूर तालुक्यातील राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या कलोते धरणाच्या उपनदी (नाला)तून विणेगाव हद्दीत नदीच्या काठावर म्हशीचा तबेला, घरगुती वापरासाठी, फार्महाऊस मधील झाडे, फळबाग यासाठी नदीत मोटर पंप लावून भरदिवसा पाणी चोरी केली जात आहे, मात्र, कर्जत येथील पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. धक्कादायक म्हणजे मोटर पंपाला विद्दुत पुरवठा करणार्‍या विद्युत वाहिनी अनेक ठिकाणी तुटलेल्या आहे. तर काही ठिकाणी जोडून चिकटपट्टी लावलेली दिसत आहे.जवळच आदिवासी वाडी असून येथील महिला कपडे धुण्यासाठी, मुले पाण्यात खेळण्यासाठी येतात, जनावरे पाणी पिण्यासाठी येतात.

येथे जवळच स्मशानभूमी आहे. तर बाजूला लागूनच गॅरेज, शोरूम,छोटे उद्योग असल्याने तेथील कामगार, गाडीचालक कपडे धुणे, आंघोळ करण्यासाठी येथे येतात. कलोते ग्रामपंचायत विणेगाव, दांडवाडी,हिलमवाडी,कातळाचीवाडी यांना होणारा पाणीपुरवठा देखील जवळपास आहे. जवळपास काम करणार्‍या व येथे येणार्‍या कामगारांना नैसर्गिक विधी उरकण्याची सोय नसल्याने आंघोळी बरोबर तेही उरकून घेत असल्याने पाणी दूषित होत आहे.

कर्जत येथे पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. पाणीपट्टी वसूल करण्यासाठी तेथील कर्मचारी या परिसरात येत असतात. पण त्यांच्या ही बाब लक्षात येताना दिसत नाही. पाणी चोरीसाठीच्या विद्युत वाहिनीमुळे अपघात झाल्यास जबाबदारी कुणाची? ह्या प्रश्नाचे उत्तर वीज वितरण कंपनी की पाठबंधारे विभाग देईल का अशी विचारणा केली जात आहे.

First Published on: March 16, 2022 8:40 PM
Exit mobile version