पेण-खोपोली मार्गाचे रूंदीकरण चुकीच्या पद्धतीने?; राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार

पेण-खोपोली मार्गाचे रूंदीकरण चुकीच्या पद्धतीने?; राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार

पेण: पेण-खोपोली मार्गाच्या रूंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून, तालुक्यातील कामार्ली नाका येथे जुन्या रस्त्याच्या डांबरीकरणाला लागून मुंबईकडे जाणार्‍या सिडकोच्या पाण्याची मोठी पाइपलाइन बाजूने गेली आहे. ते काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मयूर वनगे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. परंतु अधिकार्‍यांनी त्यावर कोणताही विचार न करता आपले काम सुरूच ठेवले असल्याने भविष्यात चुकीचे झालेले काम तोडायला लागल्यास संबंधित अधिकार्‍यांकडून त्याचा खर्च वसूल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सदर रस्त्याच्या बाजूने सिडकोची पाइपलाइन गेली असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग करीत असलेल्या कामाचा आराखडा चुकीचा निघाल्यास किंवा त्यात बदल झाल्यास कामार्ली नाक्याच्या मागील आणि पुढील केलेले काम तोडावे लागणार आहे. असे काम करणार्‍या अधिकार्‍यांवर योग्य तो कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वनगे यांनी केली आहे.

सिडकोची पाइपलाइन सिमेंट काँक्रीटची
पाइपलाइनवर पाण्याचा दाब कमी-अधिक करण्याचा वॉल आहे. कामार्ली नाक्यावर मोठी व्यवसायिक बाजारपेठ, हॉटेल्स, धाबे, लघुउद्योग, कंपन्या, सरकारी शाळा, हायस्कूल, बँक, पोस्ट कार्यालय, आरोग्य केंद्र असून, इतर गावांच्या ग्रामपंचायतीचे कार्यालय सदर ठिकाणी आहे. त्यामुळे या नाक्यावर सतत वर्दळ चालू असते. लहान-मोठ्या वाहनांची वर्दळही असते. नाक्यालागत असणारी सिडकोची ही पाइपलाइन सिमेंट काँक्रीटची असून, तिला आतापर्यंत अंदाजे २० ते २५ वर्षे झाली आहेत. या पाइपलाइनवर कोणत्याही प्रकारचे वजन पडल्यास ती कधीही कोसळून फुटू शकते आणि त्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून धोका उद्भवू शकतो. त्यामुळे कामार्ली नाका येथील रस्ता रूंदीकरण्याच्या वेळी साईडपट्टी पाइपलाइनपासून सुरक्षित अंतर सोडून करण्याची मागणी होत आहे.

काही दिवसांपूर्वी सापोली गावाच्या बाजूला रस्त्याचे काम सुरू असताना सिडकोची पाइपलाइन फुटून त्यामधून वेगाने पाणी बाहेर पडून आजूबाजूच्या शेतामध्ये आणि घरांमध्ये घुसल्याने मोठे नुकसान झाले होते. भविष्यात असा कोणताही प्रकार घडू नये म्हणून यासाठी त्वरित योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी आहे.
-मयूर वनगे, सामाजिक कार्यकर्ता

सदर जागेसंदर्भात सिडको अधिकारी आणि आमची बैठक झाली असून, प्रत्यक्ष स्थितीची पाहणी केली आहे. सदर पाइपलाइन कशी आणि कुठून घ्यायची याचा निर्णय सिडकोचे अधिकारी घेतील. मात्र सार्वजनिक आणि विकास कामात अडथळा नको. या प्रश्नातून सुवर्णमध्य काढून रूंदीकरणाचे काम केले जाईल, सर्वांनी सहकार्य करावे.
-राजेंद्र कदम,
उप विभागीय अभियंता, नॅशनल हायवे विभाग, पेण

 

First Published on: January 5, 2023 9:53 PM
Exit mobile version