’सुवर्ण’ वर्ष!

’सुवर्ण’ वर्ष!

क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ! त्यामुळे सहाजिकच भारतीय चाहत्यांच्या क्रिकेट संघाकडून सर्वाधिक अपेक्षा असतात. विराट कोहलीच्या संघाने या अपेक्षा पूर्ण केल्या, असे म्हणणे वावगे ठरु नये. अपवाद केवळ क्रिकेट वर्ल्डकपचा! इंग्लंडमध्ये झालेला वर्ल्डकप जिंकण्यासाठी कोहलीच्या संघाला प्रमुख दावेदार मानले जात होते. नऊपैकी सात साखळीसामने जिंकत त्यांनी दिमाखात उपांत्य फेरी गाठली. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीतील सामन्यात पाऊस आणि अव्वल फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फटका भारताला बसला. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस चाललेला हा सामना जिंकण्यासाठी भारतासमोर २२१ धावांचे आव्हान होते. अव्वल फलंदाज झटपट बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा या जोडीने भारताला सामना जिंकवून देण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, न्यूझीलंडने हा सामना १८ धावांनी जिंकला आणि भारताचे तिसर्‍यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्नही भंगले. परंतु, भारताचा संपूर्ण स्पर्धेतील खेळ समाधानकारक ठरला.

या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी राहिला तो भारताचा सलामीवीर रोहित शर्मा. त्याने ९ सामन्यांत विक्रमी ५ शतकांच्या मदतीने ६४८ धावा चोपून काढल्या. तसेच कर्णधार विराट कोहलीने सलग पाच सामन्यांत अर्धशतके झळकावण्याचा पराक्रम केला. त्याआधी या वर्षाची दमदार सुरुवात करताना भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. तर ऑगस्टमध्ये सुरु झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत कोहलीच्या संघाने सातपैकी सात सामने जिंकले आहेत. याच दरम्यान सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि त्याने पुढाकार घेत कोहलीला डे-नाईट कसोटी खेळण्यास तयार केले. त्यामुळे भारताने नोव्हेंबरमध्ये आपला पहिलावहिला डे-नाईट कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध खेळला. यंदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये २८ सामन्यांपैकी १९ सामन्यांत भारताला विजय मिळवण्यात यश आले.

बॅडमिंटनमध्ये भारताने मागील काही वर्षांत झपाट्याने प्रगती केली आहे. यंदा भारतीय बॅडमिंटनपटूंना संमिश्र यश मिळाले. मात्र, एका गोष्टीमुळे हे वर्ष भारतीय बॅडमिंटनसाठी अविस्मरणीय राहिले आणि ती म्हणजे पी.व्ही. सिंधूची जागतिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरी! या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. याआधी सिंधूला दोन वेळा रौप्य आणि दोन वेळा कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र तिने कोणतीही चूक केली नाही. याच स्पर्धेत पुरुषांमध्ये साई प्रणितला कांस्यपदक मिळवण्यात यश आले. तसेच युवा खेळाडू लक्ष्य सेनने या मोसमात पाच स्पर्धा जिंकल्या. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने थायलंड ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सुपर ५०० स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली. मात्र, याव्यतिरिक्त भारतीय बॅडमिंटनपटूंना सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही.

भारतीय नेमबाजांनी यंदाच्या वर्षी अफलातून कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले. नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतीयांनी २०१८ पर्यंत ३३ वर्षांत रायफल आणि पिस्तूल प्रकारात केवळ १२ सुवर्णपदके जिंकली होती. मात्र, फक्त २०१९ मध्ये भारतीय नेमबाजांनी १६ सुवर्णपदकांची नोंद केली. यावरूनच भारतीय नेमबाजांचा चढता आलेख लक्षात येतो. खासकरून सौरभ चौधरी, मनू भाकर, अंजूम मुद्गिल यांसारख्या युवा नेमबाजांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. भारताच्या १५ नेमबाजांनी पुढील वर्षी होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकमधील आपला प्रवेश निश्चित केला आहे, जी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

तसेच बॉक्सिंगमध्ये अमित पांघलने जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले. महिलांच्या जागतिक स्पर्धेत मेरी कोम, जमुना बोरो आणि लोव्हलीना बोर्गोहेन यांनी कांस्य, तर मंजू राणीने रौप्यपदकाची कमाई केली. तसेच भारताचे पुरुष आणि महिला हॉकी संघ पुढील वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले. ऑलिम्पिक हॉकी चाचणी स्पर्धेत हे दोन्ही संघ विजयी ठरले. कुस्ती आणि तिरंदाजीतही भारताने बरेच यश संपादले.

टेनिसमध्ये भारताने डेव्हिस कप लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली. रामकुमार रामनाथन, सुमित नागल यांसारख्या खेळाडूंमध्ये सामन्यागणिक सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी मात्र निराशाजनक होती. तसेच अ‍ॅथलेटिक्समध्येही भारतीयांना फारसे यश मिळाले नाही. आशियाई स्पर्धेत भारताने तीन सुवर्णपदके मिळवली आणि बर्‍याच खेळाडूंनी राष्ट्रीय विक्रम मोडले. परंतु, अ‍ॅथलेटिक्समध्ये आशियातील इतर बलाढ्य देशांशी बरोबरी करण्यासाठी भारताला अजून बरीच मेहनत करावी लागणार हे दिसून आले. परंतु, एकूणच यंदाचे वर्ष भारतासाठी सुवर्ण यश देणारे ठरले असे म्हणता येईल.

First Published on: December 28, 2019 5:56 AM
Exit mobile version