पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य!

पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य!

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. भारतीय संघ व्यवस्थापन त्याला आणि महेंद्रसिंग धोनीला वगळून युवा रिषभ पंतला जास्तीतजास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, पंतला या संधीचे सोने करता आलेले नाही. त्यामुळे पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-२० विश्वचषकासाठी कार्तिक किंवा धोनीचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल असे म्हटले जात आहे. कार्तिकही पुन्हा भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्यास उत्सुक आहे.

मला नक्कीच पुन्हा भारतीय संघात स्थान मिळायचे आहे. मला फिनिशरची भूमिका पार पाडायला आवडते आणि मला जर संधी मिळाली, तर मी पुन्हा स्वतःला सिद्ध करेन याची खात्री आहे, असे कार्तिक म्हणाला. कार्तिकने यंदाच्या स्थानिक मोसमात तामिळनाडूकडून खेळताना अप्रतिम खेळ केला आहे. त्याने विजय हजारे करंडकात ५९.७१ च्या सरासरीने आणि १२१ च्या स्ट्राईक रेटने ४१८ धावा केल्या. त्यानंतर झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याने १२६.४७ च्या स्ट्राईक रेटने ३०१ धावा फटकावल्या.

स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीबाबत कार्तिकने सांगितले, मी माझ्या खेळात बदल केलेला नाही. तुमच्या संघाला सामने जिंकवून देणे, ही सर्वात आव्हानात्मक आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही तामिळनाडूसाठी खेळत आहात किंवा आयपीएलमधील संघाकडून याने फरक पडत नाही. माझ्या गाठीशी बराच अनुभव आहे. या अनुभवाचा उपयोग करुन मी माझ्या संघाला कठीण परिस्थितून बाहेर काढण्याचा आणि संघाला सामने जिंकवून देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक क्रिकेटपटूला भारतासाठी खेळायचे असते आणि मी याला अपवाद नाही. भारतीय संघात पुनरागमन करण्यास मी खूप उत्सुक आहे.

तामिळनाडूसाठी चांगल्या कामगिरीचा प्रयत्न!

रणजी करंडकाच्या नव्या मोसमाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतही तामिळनाडूसाठी चांगली कामगिरी करण्याचा कार्तिकचा प्रयत्न असेल. मला तामिळनाडूसाठी खेळताना नेहमीच मजा येते. आमचा संघ रणजी करंडकात दमदार खेळ करण्यास सज्ज आहे. आम्हाला बाद फेरी गाठायची आहे, पण आम्ही एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करु. मी या स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांत खेळणार असून या सामन्यांत चांगल्या कामगिरीचा माझा प्रयत्न असेल, असे कार्तिकने सांगितले.

First Published on: December 9, 2019 1:16 AM
Exit mobile version