..अन् फिनिशिंग लाईनवर आनंदाश्रू ओघळले : आयर्नमन अश्विनी देवरे

..अन् फिनिशिंग लाईनवर आनंदाश्रू ओघळले : आयर्नमन अश्विनी देवरे

नाशिकरोड : सरावापासून सुरू झालेला अत्यंत खडतर प्रवास जेव्हा फिनिशिंग लाईनवर येऊन थांबला तेव्हा आनंदाश्रू ओघळले.. फिनिशिंग लाईनला स्पर्श करताना माझ्या जीवनाचे सार्थक झाले… यासाठी दोन वर्षांपासून अत्यंत खडतर सराव केला, माझे ध्येय गाठण्यासाठी नोकरी, संसार सांभाळून १२-१२ तास सराव करणे नक्कीच मोठे दिव्य होते.. अशा शब्दांत आयर्नमॅन अश्विनी देवरे यांनी भावना व्यक्त केल्या.

नाशिक पोलीस आयुक्तालयातील व नाशिकरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अश्विनी गोकुळ देवरे यांनी नुकतीच कझाकीस्थान येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत किताब पटकावला. त्यांनी संपूर्ण राज्यातून प्रथम महिला पोलीस कर्मचारी म्हणुन आयर्नमॅन म्हणून बहूमान मिळवला. कझाकीस्थान येथून नाशिकरोड येथे शुक्रवारी (दि.१९) सकाळी रेल्वेस्थानकावर नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उपायुक्त संजय बारकुंड, राखीव पोलीस निरीक्षक सोपान देवरे व नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. रेल्वेस्थानक ते नाशिकरोड पोलीस ठाणे व तेथून जयभवानी रोडमार्गे अश्विनी देवरे यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला पोलीस व कर्मचारी, नातेवाईक तसेच नागरिकांनी आनंद व्यक्त पुष्पहार व गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला. मिरवणुकीत के. जे. मेहता ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मिरवणुकीत सहभाग घेत त्यांचे स्वागत केले. नाशिकरोड पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांनी देवरे यांचे अभिनंदन व भव्य स्वागत केले.

अश्विनी देवरेचे कष्ट आम्ही पाहिले. त्यांच्या यशाने नाशिक पोलिसांची मान अभिमानाने उंचावली आहे. तिचे कार्य इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा श्रींगी-चौगुले यांनी व्यक्त केली. या यशामागे सर्व वरिष्ठांचे पाठबळ असल्याचे देवरे यांनी यावेळी सांगितले.

First Published on: August 20, 2022 2:53 PM
Exit mobile version