आर्चरला माझ्याविरुद्ध यश मिळालेले नाही!

आर्चरला माझ्याविरुद्ध यश मिळालेले नाही!

स्टिव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ अ‍ॅशेस मालिकेतील तिसर्‍या सामन्यात खेळू शकला नाही. या मालिकेतील दुसर्‍या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा उसळता चेंडू स्मिथच्या मानेला लागला आणि तो जागेवरच कोसळला. मात्र, तो आता पूर्णपणे फिट झाला असून सराव सामन्यात आणि त्यानंतर होणार्‍या चौथ्या कसोटीत खेळणार आहे. या सामन्यातही तो आर्चरविरुद्ध खेळण्याच्या पद्धतीत बदल करणार नाही.

मी आर्चरविरुद्ध माझ्या खेळण्याच्या पद्धतीत बदल करणार नाही. त्याला मला दबावात टाकले आहे आणि त्याने माझ्यावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे, अशी चर्चा होत आहे. परंतु, असे असतानाही त्याला अजून मला बाद करण्यात यश आलेले नाही. त्याचा चेंडू माझ्या मानेला लागला, पण लॉर्ड्सवरील खेळपट्टी तितकीशी चांगली नव्हती. इंग्लंडच्या इतर गोलंदाजांना माझ्याविरुद्ध यश मिळाले आहे, असे म्हणता येईल. त्यांनी मला याआधी बाद केले आहे, पण आर्चरने नाही, असे स्मिथ म्हणाला.

दुसर्‍या सामन्यात आर्चरचा चेंडू मानेवर लागल्यानंतर स्मिथच्या डोक्यात बरेच विचार येत होते. त्याला फिलिप ह्युजच्या अपघाती मृत्यूचीही आठवण झाली. स्मिथचा माजी सहकारी ह्युजचा २०१४ साली मानेला चेंडू लागून मृत्यू झाला होता. याबाबत त्याने सांगितले, मला जिथे चेंडू लागला, त्यामुळे मला काही गोष्टी आठवल्या. सर्वात आधी मला काही वर्षांपूर्वी झालेल्या वाईट गोष्टीची आठवण झाली. मी काहीसा दुःखी झालो. मात्र, त्यानंतर ’मला काहीही झाले नाही, मी बरा आहे’, हा विचार माझ्या डोक्यात आला.

First Published on: August 29, 2019 5:42 AM
Exit mobile version