आर्चर आयपीएलमधून आऊट!

आर्चर आयपीएलमधून आऊट!

आर्चर

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगातील सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहेत. मात्र, त्याआधीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा आणि इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर कोपराच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याची माहिती गुरुवारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) दिली.

आर्चरच्या उजव्या कोपराला स्ट्रेस फ्रॅक्चर आहे. त्याच्यावर आता ईसीबीची वैद्यकीय टीम उपचार करेल. तो जूनमध्ये होणार्‍या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी फिट होईल अशी आशा आहे, असे ईसीबीने आपल्या वेबसाईटवर लिहिले. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात आर्चरला ही दुखापत झाली. या दुखापतीमुळे आर्चरला आता आयपीएल आणि त्याआधी होणार्‍या श्रीलंका दौर्‍यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे. यंदाच्या आयपीएलला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

राजस्थानने ठेवले होते कायम!
मागील वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या खेळाडू लिलावाआधी राजस्थान रॉयल्सने जोफ्रा आर्चरला संघात कायम ठेवले होते. २०१८ मोसमाआधी राजस्थानने आर्चरला ७.२० कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्याने २०१८ मध्ये आपल्या पहिल्या मोसमाच्या १० सामन्यांत १५ विकेट, तर २०१९ मध्ये ११ सामन्यांत ११ विकेट मिळवल्या होत्या. या कामगिरीच्या आधारे त्याची इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकासाठी इंग्लंडच्या संघात निवड झाली होती.त्याने या स्पर्धेत २० मोहरे टिपत सर्वांना प्रभावित केले.

First Published on: February 7, 2020 5:49 AM
Exit mobile version