Ashes Series 2021 2nd test : पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत; वॉर्नर-लाबुशानेची शानदार खेळी

Ashes Series 2021 2nd test : पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत; वॉर्नर-लाबुशानेची शानदार खेळी

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इग्लंडमध्ये ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे. पहिल्या सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर यजमान ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या सामन्यात वेगळ्या कर्णधाराच्या नेतृत्वात मैदानात उतरला आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्याला ॲडिलेडवर गुरुवारपासून सुरूवात झाली. मात्र कांगारूच्या संघाला सामन्याच्या पूर्वसंध्येलाच जबरदस्त धक्का बसला. कारण कर्णधार पॅट कमिन्स ॲशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून बाहेर गेला. त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. तर पहिल्या कसोटी सामन्यात १५४ धावा करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत पहिल्या दिवसाअखेर शानदार खेळी केली आणि संघाला मजबूत सुरूवात करून दिली. पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने ८९ षटकांत २ बाद २२१ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाला सुरूवातीलाच एक मोठा झटका बसला होता. जेव्हा संघाचा सलामीवीर फलंदाज मार्कस हॅरीस डावाच्या ७.३ षटकात केवळ ३ धावांवर तंबूत परतला. हॅरीसला स्टुअर्ट ब्रॉडने माघारी पाठवले. मात्र त्यानंतर डेविड वॉर्नर आणि मार्नस लाबुशानेने शानदार खेळी करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. या दोघांनी १७२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नर त्याच्या शतकाला मुकला. तो शतकापासून फक्त ५ धावांनी दूर असताना त्याला ९५ धावांवर बेन स्टोक्सने माघारी पाठवले. तर सध्या मार्नस लाबुशाने ९५ आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ १८ धावांवर खेळपट्टीवर टिकून आहेत.

दरम्यान, पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाच्या संघाने मजबत पकड बनवली आहे. तर इंग्लंडकडून स्टोक्स आणि ब्रॉड वगळता कोणत्याच गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही. इंग्लंडसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे कारण पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेऊन मालिकेत बरोरी साधण्याची इंग्लिश संघाला संधी आहे.


हे ही वाचा:  http://बॉम्बे जिमखान्यातर्फे पहिल्या कसोटी सामन्याच्या वर्धापनदिनासाठी दिग्गज खेळाडूंची हजेरी


 

First Published on: December 16, 2021 5:54 PM
Exit mobile version