शेन वॉर्नच्या बॅगी ग्रीन टोपीवर ५ कोटींची बोली!

शेन वॉर्नच्या बॅगी ग्रीन टोपीवर ५ कोटींची बोली!

ऑस्ट्रेलियातील वणव्याचे लोण पसरत चालले असून हजारो प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर बर्‍याच नागरिकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. तसेच २००० घरे उध्वस्थ झाली असून २६ लोक मृत पावले आहेत. या पीडितांना मदत म्हणून ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू शेन वॉर्नने काही दिवसांपूर्वी त्याच्या कसोटी सामन्यांत वापरलेल्या टोपीचा (बॅगी ग्रीन) लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या टोपीवर १० लाख ७ हजार ५०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच ४ कोटी ८७ लाख ६८ हजार ८७० रुपयांची बोली लागली आहे.

माझ्या कसोटीतील टोपीवर बोली लावणार्‍या सर्वांचे मी आभार मानतो. ज्या व्यक्तीने ही टोपी विकत घेतली, त्याच्या उदार मनाबद्दल मी खरच धन्यवाद देतो. टोपीवर इतकी मोठी बोली लावल्याचा मला आनंद आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा ही रक्कम खूप जास्त आहे. ही रक्कम थेट रेड क्रॉसला दिली जाईल. सर्वांना खूप धन्यवाद, असे वॉर्नने आपल्या ट्विटमध्ये लिहिले. वॉर्नच्या टोपीला सर्वाधिक बोली लावणार्‍या व्यक्तीला त्याने स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

कसोटी हा क्रिकेटचा सर्वात जुना आणि पारंपरिक प्रकार असल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये ’बॅगी ग्रीन’ टोपीला खूप महत्त्व आहे. मात्र, असे असतानाही पीडितांना मदत करण्यासाठी वॉर्नने आपल्या टोपीचा एका ऑनलाइन वेबसाइटवर लिलाव केला. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असणार्‍या वॉर्नच्या नावे १४५ कसोटी सामन्यांत ७०८, तर १९४ सामन्यांत २९३ विकेट्स आहेत.

First Published on: January 11, 2020 2:20 AM
Exit mobile version