वॉर्नर पुन्हा बरसला; ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका

वॉर्नर पुन्हा बरसला; ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका

डेविड वॉर्नर

डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ९ विकेट्स व ४२ चेंडू राखून पराभव केला. हा ऑस्ट्रेलियाचा या मालिकेतील सलग दुसरा विजय होता. त्यामुळे त्यांनी ३ सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. तब्बल पाच वर्षांनी ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकण्यात यश आले आहे. पहिल्या टी-२० सामन्यात नाबाद १०० धावांची खेळी करणार्‍या वॉर्नरने दुसर्‍या सामन्यात नाबाद ६० धावांची खेळी केली.

दुसर्‍या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर कुसाल परेर अवघ्या एका धावेवर धावचीत झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या आविष्का फर्नांडो आणि दानुष्का गुणथिलकाने श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुणथिलकाला २१ धावांवर बिली स्टॅनलेकने, तर फर्नांडोला १७ धावांवर डावखुरा फिरकीपटू एगारने माघारी पाठवले. कुसाल परेराने फटकेबाजी करत १९ चेंडूत २७ धावांची खेळी केली. त्याचा एगारनेच त्रिफळा उडवला. पुढे श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला १० धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे श्रीलंकेचा डाव १९ षटकांनंतर ११७ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या स्टॅनलेक, एगार, पॅट कमिन्स आणि अ‍ॅडम झॅम्पा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

११८ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला डावाच्या तिसर्‍याच चेंडूवर मलिंगाने माघारी पाठवले. फिंचला भोपळाही फोडता आला नाही. परंतु, पहिल्या टी-२० सामन्यातील शतकवीर वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यांनी पाचव्या षटकातच ऑस्ट्रेलियाच्या ५० धावा, तर अकराव्या षटकात १०० धावा फलकावर लावल्या. वॉर्नरने ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे टी-२० क्रिकेटमधील तेरावे अर्धशतक होते. तसेच स्मिथने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर या दोघांनी १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. त्यांनी ११७ धावांची अभेद्य भागीदारी केली. वॉर्नरने ४१ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ६०, तर स्मिथने ३६ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ५३ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक – श्रीलंका : १९ षटकांत सर्वबाद ११७ (परेरा २७, गुणथिलका २१; झॅम्पा २/२०, स्टॅनलेक २/२३, एगार २/२७, कमिन्स २/२९) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : १३ षटकांत १ बाद ११८ (वॉर्नर नाबाद ६०, स्मिथ नाबाद ५३, मलिंगा १/२३).

First Published on: October 31, 2019 4:58 AM
Exit mobile version