ऑस्ट्रेलियाचा पाकला व्हाईटवॉश

ऑस्ट्रेलियाचा पाकला व्हाईटवॉश

ऑफस्पिनर नेथन लायनने दुसर्‍या डावात पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत अ‍ॅडलेड येथे झालेल्या डे-कसोटीत ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि ४८ धावांनी विजय मिळवून दिला. त्यामुळे दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला २-० असा व्हाईटवॉश दिला. तसेच त्यांनी या मालिकेतील दोन्ही सामने जिंकत जागतिक कसोटी स्पर्धेत १२० गुणांची कमाई केली. या सामन्याच्या पहिल्या डावात नाबाद ३३५ धावांची खेळी करणार्‍या डेविड वॉर्नरला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.

या डे-कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ३ बाद ५८९ धावांवर घोषित केला, ज्याचे उत्तर देताना पाकिस्तानचा डाव ३०२ धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे २८७ धावांची आघाडी होती. त्यांनी पाकिस्तानला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे फलंदाज दुसर्‍या डावात आपले खेळ सुधारतील अशी आशा होती. मात्र, तसे झाले नाही. त्यांचा हा डाव २३९ धावांत संपुष्टात आला. शान मसूद (६८), असद शफिक (५७) आणि मोहम्मद रिझवान (४५) यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगली झुंज दिली. परंतु, त्यांना इतरांची साथ लाभली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना एक डाव आणि ४८ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून लायनने ६९ धावांत ५, तर जॉश हेझलवूडने ६३ धावांत ३ गडी बाद केले.

ऑस्ट्रेलिया : पहिला डाव – ३ बाद ५८९ वर घोषित विजयी वि. पाकिस्तान : ३०२ आणि २३९ (शान मसूद ६८, असद शफिक ५७, मोहम्मद रिझवान ४५; नेथन लायन ५/६९, जॉश हेझलवूड ३/६३).

First Published on: December 3, 2019 5:35 AM
Exit mobile version