अजंठा, रामेश्वरमची अंतिम फेरी धडक

अजंठा, रामेश्वरमची अंतिम फेरी धडक

मुंबईच्या अजंठा आणि चेन्नईच्या रामेश्वरम या संघांनी ऑटोमिक एनर्जी आंतर विभागीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मागील वर्षीच्या अंतिम फेरीतही हेच दोन संघ आमनेसामने आले होते, ज्यात अजंठाने बाजी मारली होती. उपांत्य फेरीत अजंठाने गोलकोंडाचा, तर रामेश्वरमने एलोरावर मात केली.

अणुशक्ती नगर येथे सुरु असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या अजंठाने हैदराबादच्या गोलकोंडाचा ३३-२० असा पराभव केला. या सामन्याच्या मध्यंतराला अजंठाकडे १८-१० अशी आघाडी होती. उत्तरार्धातही त्यांनी चांगला खेळ सुरु ठेवत हा सामना १३ गुणांच्या फरकाने जिंकला. नितीन पवार आणि प्रतीक शिरकर यांनी अजंठाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात चेन्नईच्या रामेश्वरम संघाने मुंबईच्या एलोरा संघाला ३२-२५ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली. या सामन्याच्या मध्यंतराला रामेश्वरमने १५-१० अशी आघाडी मिळवली होती. कुमारसन, राजा मुरगन यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला रामेश्वरमच्या विजयाचे श्रेय जाते.

First Published on: February 8, 2020 5:01 AM
Exit mobile version