भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी बांगलादेशचा संघ जाहीर; ‘हा’ खेळाडू अद्याप बाहेरच

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी बांगलादेशचा संघ जाहीर; ‘हा’ खेळाडू अद्याप बाहेरच

बांगलादेश संघाने भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. बांगलादेश आणि भारत यांच्यात १४ डिसेंबरपासून पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. या पहिल्या कसोटीसाठी प्रथमच अव्वल फळीतील फलंदाज झाकीर हसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, अनुभवी तमीम इक्बाल दुखापत ग्रस्त असल्याने हसनचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हसनला भारत ‘अ’ विरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीत सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. हसन प्रथम श्रेणी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. (bangladesh anncounced team for first test against india tamim iqbal is still left out)

फिटनेसच्या समस्येमुळे भारताविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत नसलेला वेगवान गोलंदाज तस्किन अहमदचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशने पहिले दोन सामने जिंकून एकदिवसीय मालिका जिंकली. दोन सामन्यांची कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे. दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळवला जाणार आहे.

दरम्यान, “आमच्या फिजिओने सांगितले की तमिम पहिली कसोटी खेळू शकणार नाही, परंतु आम्ही दुसऱ्या कसोटीसाठी त्याच्या वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहोत. त्यामुळे आम्ही केवळ सलामीच्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे”, असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे निवडक मिन्हाजुल आबेदीन यांनी सांगितले.

पहिल्या कसोटीसाठी बांगलादेशचा संघ :

महमुदुल हसन जॉय, नजमुल हसन शांतो, मोमिनुल हक, यासिर अली चौधरी, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, नुरुल हसन, मेहिदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, सय्यद खालिद अहमद, इबादत हुसेन, शरीफुल इस्लाम, झाकीर हसन, रेझाउर रहमान राजा आणि अनामुल हक बिजॉय.

दरम्यान, भारतीय संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर असून भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळण्यात आला होता. या सामन्यात बांगलादेशने भारतीय संघाचा ५ धावांनी पराभव करत सनसनाटी विजय मिळवला. तसेच, बांगलादेशने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. सामन्यातील या पराभवाचा भारतीय संघाला धक्का बसला असून भारताने एकदिवसीय मालिका आपल्या हातातून गमावली आहे.


हेही वाचा – पाकिस्तानात इंग्लंडचा संघ वास्तव्यास असलेल्या हॉटेलजवळ गोळीबार

First Published on: December 9, 2022 10:07 AM
Exit mobile version