बांगलादेशी क्रिकेटपटू संजिदा इस्लामच्या लग्नाचे फोटोशूट व्हायरल!

बांगलादेशी क्रिकेटपटू संजिदा इस्लामच्या लग्नाचे फोटोशूट व्हायरल!

संजिदा इस्लाम

लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक असतो आणि हा क्षण फोटोच्या माध्यमातून साठवून ठेवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो. त्यामुळे आजकाल ‘वेडिंग फोटोशूट’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लग्न झालेले प्रत्येकच जोडपे सुंदर वेडिंग फोटोशूट करण्याचा प्रयत्न करते. आता बांगलादेशची महिला क्रिकेटपटू संजिदा इस्लामच्या लग्नाचे फोटोशूट चांगलेच व्हायरल झाले आहे. २४ वर्षीय संजिदा इस्लाम प्रथम श्रेणी क्रिकेटपटू मिम मोसादेकशी विवाहबंधनात अडकली आहे. तिने आपले पहिले प्रेम क्रिकेट बॅट हातात घेत आणि साडी परिधान करत लग्नाचे फोटो काढले. तसेच तिने लग्नाचे फोटोशूट क्रिकेटच्या मैदानात केल्याने क्रिकेट चाहते भलतेच खुश दिसले.

ड्रेस, दागिने, क्रिकेट बॅट

संजिदा इस्लाम ही बांगलादेश महिला क्रिकेट संघात फलंदाज म्हणून खेळते. तिने २०१२ मध्ये आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत १६ एकदिवसीय आणि ५४ टी-२० सामन्यांत बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले असून यात अनुक्रमे १७४ आणि ५२० धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये तिच्या नावावर एक अर्धशतक आहे. तिचा लग्नाचा फोटो आयसीसीने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केला आणि त्याखाली ‘ड्रेस, दागिने, क्रिकेट बॅट. क्रिकेटपटूंच्या लग्नाचे फोटोशूट असे दिसते,’ अशी कॅप्शन लिहिली.

संजिदा इस्लाम

 

 

First Published on: October 21, 2020 7:24 PM
Exit mobile version