पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर बँकेचा ताबा

पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर बँकेचा ताबा

पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने पुण्यातही व्हावेत या हेतूने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने गहुंजे येथे क्रिकेट स्टेडियम उभारले. मात्र हे स्टेडियम आता संकटात येण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रने या स्टेडियमचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. मैदानाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बँक ऑफ महाराष्ट्रकडून ६९.५० कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाचे हप्ते थकवल्यामुळे बँकेने ही कारवाई केली आहे.

कारवाईचा महाराष्ट्राच्या संघावर परिणाम नाही

बँक ऑफ महाराष्ट्र, कर्नाटक बँक, बँक ऑफ बडोदा आणि आंध्र बँक या ४ बँकांकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने विविध कारणांसाठी ६९.५० कोटींचे कर्ज घेतले होते. पण या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रने या स्टेडियमचा ताबा घेतला आहे. असे असले तरी या कारवाईचा महाराष्ट्राच्या संघाच्या सरावावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांनी स्पष्ट केलं आहे.

बँकेला तात्काळ १७.१६ कोटी रुपये भरणे आवश्यक

बँकेला ताबा घेण्यापासून थांबवण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला बँकेला तात्काळ १७.१६ कोटी रुपये भरणे आवश्यक आहे. त्यापैकी ४.५ कोटी रुपये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बँकेमध्ये भरले असून त्यांना उर्वरित १२ करोडहून जास्तची रक्कम भरणे अनिवार्य आहे.
First Published on: November 7, 2018 4:15 PM
Exit mobile version