Bio bubble : BCCI खेळाडूंना विश्रांती देण्यात पुढाकार घेणार

Bio bubble : BCCI खेळाडूंना विश्रांती देण्यात पुढाकार घेणार

भारतीय संघ सलग क्रिकेट खेळत आल्याने आणि पुरेशी विश्रांती न भेटल्यामुळे भारतीय संघाचा बायो-बबल्समध्ये पराभव झाला अशी टिप्पणी काही भारतीय खेळाडूंनी केली होती. तर भारतीय संघ सलग क्रिकेट खेळल्याने थकल्याने विराट कोहलीसारख्या सर्वोच्च भारतीय क्रिकेट खेळाडूच्या टिप्पणीची दखल घेऊन बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत पुढाकार घेणार असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी क्रिकेट सल्लागार समितीसमोर हजेरी लावली तेव्हा भारतीय संघातील खेळांडूवर ताणतणाव आणि थकवा असल्याचा उल्लेख केला होता.

क्रिकेट संघ निवड समितीने देखील खेळाडूंच्या विश्रांती बद्दल बीसीसीआयकडे मागणी केली होती. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरी गाठू न शकल्याचे एक कारण म्हणजे खेळाडूंना न मिळालेला आराम असे समितीने बीसीसीआयला सूचित केले होते. माहितीनुसार बीसीसीआयला भारतीय खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्यापासून बायो-बबल रोखायचे आहे.

बीसीसीआयने सांगितले की, “एखाद्या खेळाडूने किती क्रिकेट खेळले आहे यावर अवलंबून आहे की त्याला किती विश्रांती द्यायला हवी आणि याबाबत बीसीसीआय पुढाकार घेईल. थकवा या समस्येची आम्हाला जाणीव आहे. ज्या खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे, त्याच्या बदल्यात चांगला असेल त्या खेळाडूला संघात स्थान दिले जाईल”. या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून संघाचे प्रशिक्षक द्रविड हे त्या खेळाडूला विश्रांती देण्याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना खेळाडूच्या प्रकृती बद्दल माहिती देतील.

भारतीय संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर गेल्यानंतर भारतीय संघाचे मावळते प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले होते की, “बायो-बबलमधील जीवन खेळाडूंना साहजिकच हताश करू शकते. विराट कोहलीच्या फॉर्मचे श्रेय देखील मोठ्या कालखंडापासून बायो-बबलमध्ये राहण्याला द्यायला हवे. मी त्याच्या खेळीबद्दल भाष्य करणार नाही. खेळाडू कोण आहे याची मला पर्वा नाही. प्रत्येक खेळाडूच्या खेळीतील सरासरी बदलत असते”.

न्यूझीलंडसोबत होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी संघातील विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या तीन दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. तर विराट कोहलीच्या जागेवर रोहित शर्माला कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने देखील थकवा असल्याचे सांगितले होते. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यापूर्वी त्याला यूएईमधून घरी जाण्याची परवानगी दिली होती.


हे ही वाचा : विराट कोहलीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा नराधम पोलिसांच्या ताब्यात


 

First Published on: November 10, 2021 6:23 PM
Exit mobile version