बीसीसीआयने पुलवामा हल्ल्यातील शहिदांना ५ कोटींची मदत करावी

बीसीसीआयने पुलवामा हल्ल्यातील शहिदांना ५ कोटींची मदत करावी

आयसीसीची बीसीसीआयला माहितीआयसीसीची बीसीसीआयला माहिती

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने केलेल्या कारवाईत ४० जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभरातून शहीद जवानांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आता बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनीही शहीद जवानांच्या कुटुंबाला बीसीसीआयने किमान ५ कोटींची मदत करावी, अशी प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांना विनंती केली आहे. यासंदर्भात खन्ना यांनी राय यांना पत्रही लिहिले आहे. तसेच बीसीसीआयशी संलग्न असलेल्या राज्य क्रिकेट संघटना आणि आयपीएलमधील संघ मालकांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन खन्ना यांनी केले आहे.

आम्ही दुःखी आहोत आणि प्रत्येक भारतीयाप्रमाणेच आम्हीही पुलवामा अतिरेकी हल्ल्याची निंदा करतो. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी प्रशासकीय समितीला अशी विनंती करतो की बीसीसीआयने योग्य त्या सरकारी संस्थांमार्फत शहीद जवानांच्या कुटुंबाला किमान ५ कोटींची मदत करावी, तसेच राज्य क्रिकेट संघटना आणि आयपीएलमधील संघ मालकांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे खन्ना यांनी राय यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले होते, तसेच शहीद जवानांच्या आदरार्थ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २४ फेब्रुवारीला होणार्‍या पहिल्या टी-२० सामन्यात तसेच २३ मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात दोन मिनिटांची शांतता पाळण्यात यावी अशीही विनंती या पत्रातून खन्ना यांनी केली होती.

शनिवारी इराणी करंडक जिंकल्यानंतर विदर्भाच्या संघाने आपल्या इनामाची रक्कम पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे.

पीएसएलचे प्रक्षेपण बंद
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरू केलेली असतानाच आता पाकिस्तान क्रिकेटलाही मोठा झटका बसला आहे. आयपीएलप्रमाणेच असलेली स्पर्धा पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) सामन्यांचे डीस्पोर्ट या वाहिनेने भारतात प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएसएलच्या प्रसारणाचे सर्व हक्क डीस्पोर्टकडे आहेत. पीएसएलचा सध्या चौथा मोसम सुरु आहे. आधीचे दोन मोसम केवळ वेबवरतीच प्रसारित करण्यात आले होते, पण गेल्यावर्षी डीस्पोर्टने या स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क मिळविले होते. पुलवामा येथील हल्ल्यानंतर डीस्पोर्टने या स्पर्धेचे सामने भारतात न दाखवण्याचा निर्णय घेतल्याने पाक क्रिकेटला मोठा झटका बसला आहे.

First Published on: February 18, 2019 4:03 AM
Exit mobile version