भुवनेश्वरची सरावाला सुरुवात

भुवनेश्वरची सरावाला सुरुवात

भुवनेश्वर

भारतीय संघाचा क्रिकेट विश्वचषकात गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध सामना होणार आहे. या सामन्याआधी भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने मंगळवारी जवळपास ३०-३५ मिनिटे नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव केला. मात्र, तो ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार्‍या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे, पण त्याने गोलंदाजीचा कसून सराव केला ही भारतीय संघ व्यवस्थापनासाठी आनंदाची बातमी आहे.

पाकिस्तानविरुद्ध मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात गोलंदाजीदरम्यान भुवनेश्वरच्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो २-३ सामन्यांना मुकेल अशी माहिती त्यावेळी कर्णधार विराट कोहलीने दिली होती. मात्र, भुवनेश्वरने मंगळवारी झालेल्या सराव सत्रात भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहात यांच्या देखरेखीखाली सराव केला. सुरुवातीला त्याने कमी रनअप घेऊन गोलंदाजी केली. काही वेळाने त्याने आपला नेहमीचा, पूर्ण रनअप घेत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. हा सराव सुरू असताना कर्णधार कोहलीनेही त्याची विचारपूस केली. त्यामुळे तो लवकरच पुन्हा मैदानात परतेल अशी संघ व्यवस्थापनाला आशा आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी सोमवारी इंग्लंडमध्ये दाखल झाला. भुवनेश्वरची दुखापत गंभीर असल्यामुळे सैनीला इंग्लंडमध्ये बोलावण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सैनी फक्त नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी इंग्लंडमध्ये आला आहे, असे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. सैनीला विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले होते, पण आता भुवनेश्वर फिट असल्याने त्याला खेळण्याची संधी मिळणार नाही. भुवनेश्वर या विश्वचषकात पहिले तीन सामने खेळला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

First Published on: June 26, 2019 4:48 AM
Exit mobile version