पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याआधी गोलंदाजांना सरावासाठी दोन महिने हवे!

पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याआधी गोलंदाजांना सरावासाठी दोन महिने हवे!

करोनामुळे जवळपास दोन महिने क्रिकेटचे सामने झालेले नाहीत. मात्र, आता काही देशांत लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणल्यामुळे पुन्हा क्रिकेट सुरु करण्याबाबत चर्चा होत आहे. क्रिकेटपटू मागील दोन महिने घरातच आहेत. त्यामुळे त्यांना पूर्णपणे फिट होण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यातच आता गोलंदाजांना दुखापती टाळायच्या असतील तर पुन्हा खासकरुन कसोटी क्रिकेट खेळण्याआधी किमान दोन महिने सराव गरजेचा आहे असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) म्हणणे आहे. त्यामुळे इतक्याच कसोटी सामने होण्याची शक्यता कमीच आहे.

इंग्लंडच्या खेळाडूंनी या आठवड्यापासून वैयक्तिक सरावाला सुरुवात केली आहे. जुलैमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेपासून पुन्हा क्रिकेटला सुरुवात होईल अशी इंग्लंडला आशा आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये पाकिस्तान संघ इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात तीन टी-२० आणि तीन कसोटी सामने होणार आहेत. हे सामने रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, गोलंदाजांना सरावासाठी पुरेसा वेळ न देता क्रिकेटला सुरुवात केल्यास त्यांना दुखापती होऊ शकतील असे आयसीसीने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याआधी ८ ते १२ आठवडे आणि एकदिवसीय, टी-२० क्रिकेट खेळण्याआधी किमान सहा आठवडे गोलंदाजांना सरावासाठी मिळाले पाहिजेत असे आयसीसीला वाटते.

खेळाडू, पंचांत सोशल डिस्टंसिंग
आयसीसीने या आठवड्यात चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच खेळाडू आणि पंचांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावे, त्याचप्रमाणे पंचांना किंवा इतर खेळाडूंना टोपी, गॉगल, टॉवेल आदी देताना त्यांना स्पर्श करणे टाळावे असेही आयसीसीने संघांना सांगितले आहे.

First Published on: May 24, 2020 5:10 AM
Exit mobile version