World Test Championship : भारत ब्रिटनच्या ‘रेड लिस्ट’मध्ये; अंतिम सामन्याचे काय?

World Test Championship : भारत ब्रिटनच्या ‘रेड लिस्ट’मध्ये; अंतिम सामन्याचे काय?

भारत विरुद्ध न्यूझीलंड - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना 

भारतात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर, ब्रिटनने भारताला प्रवासाच्या ‘रेड लिस्ट’मध्ये ठेवले आहे. त्यामुळे भारतीयांना ब्रिटनमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच भारतातून परतणाऱ्या ब्रिटनच्या नागरिकांना १० दिवस हॉटेल क्वारंटाईनमध्ये राहणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा) अंतिम सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये हा अंतिम सामना होणारा आहे. साऊथहॅम्पटन येथे होणाऱ्या या सामन्याला १८ जूनपासून सुरुवात होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला आणि ब्रिटनने भारताला रेड लिस्टमध्ये ठेवले असले तरी अंतिम सामना ठरल्याप्रमाणेच होईल असा आयसीसीला विश्वास आहे.

इंग्लंड सरकारशी चर्चा

कोरोनातही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरक्षितपणे सुरु ठेवण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीच्या इतर सदस्यांनी योजना आखल्या आहेत. त्यामुळे ठरल्याप्रमाणेच जून महिन्यात इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा सामना होईल याची आम्हाला खात्री वाटते. आम्ही इंग्लंड सरकारशी चर्चा करत आहोत. एखादा देश रेड लिस्टवर असल्याने काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे आयसीसीकडून सांगण्यात आले.

…तोपर्यंत भारत बहुधा रेड लिस्टमध्ये नसेल

बीसीसीआयने मात्र इतक्यातच कोणताही निर्णय घेता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. जूनमध्ये कोरोनाची स्थिती कशी असेल हे आता सांगणे अवघड आहे. प्रवासाचे नियम हे परिस्थितीनुसार बदलत जातात. भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडसाठी रवाना होईल आणि तोपर्यंत भारत बहुधा ब्रिटनच्या ‘रेड लिस्ट’मध्ये नसेल, असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

First Published on: April 20, 2021 9:09 PM
Exit mobile version