चेन्नईचा विजयी रथ रोखण्याचे मुंबईपुढे आव्हान

चेन्नईचा विजयी रथ रोखण्याचे मुंबईपुढे आव्हान

आयपीएल २०१९

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात या मोसमातील पहिला सामना बुधवारी वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. मुंबईसाठी यंदाच्या मोसमाची सुरुवात साधारण राहिली आहे. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर बंगळुरूविरुद्ध दमदार पुनरागमन केले. मात्र, पंजाबविरुद्धच्या तिसर्‍या सामन्यात त्यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. याउलट गतविजेत्या चेन्नईने या मोसमाची अप्रतिम सुरुवात केली असून, त्यांनी ३ पैकी ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे बुधवारी होणार्‍या सामन्यात मुंबईसमोर चेन्नईला रोखण्याचे आव्हान असणार आहे.

यंदाच्या मोसमातील आपल्या तिसर्‍या सामन्यात मुंबई इंडियन्सचा किंग्स इलेव्हन पंजाबने ८ विकेट राखून पराभव केला होता. या सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईच्या मधल्या फळीला चांगले प्रदर्शन करता आले नाही. अशीच काहीशी अवस्था पहिल्या दोन सामन्यांतही होती. रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक या मुंबईच्या सलामीवीरांनी तीनही सामन्यांत तीसपेक्षा जास्त धावांची सलामी दिली आहे. मधल्या फळीत पहिल्या दोन सामन्यांत अनुभवी युवराज सिंगने अप्रतिम फलंदाजी केली होती. मात्र, पंजाबविरुद्ध त्याला २२ चेंडूंत १८ धावाच करता आल्या.

तसेच मागील वर्षी सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करणार्‍या सूर्यकुमार यादव आणि किरॉन पोलार्ड यांना धावांसाठी झुंजावे लागत आहे. त्यामुळे या सामन्यात युवा ईशान किशनला संधी मिळू शकेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह वगळता मुंबईच्या एकाही गोलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. विंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ किंवा ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरनडॉर्फला मिचेल मेकल्यानघनच्या जागी संधी मिळू शकेल.

चेन्नईने त्यांच्या मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ८ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात फलंदाजीत चेन्नईची ३ बाद २७ अशी अवस्था असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ४६ चेंडूत नाबाद ७५ धावांची खेळी केली. त्यामुळे चेन्नईने आपल्या २० षटकांत १७५ धावा केल्या. याचा पाठलाग करताना राजस्थानला अखेरच्या षटकात १३ धावांची गरज होती. मात्र, ड्वेन ब्रावोने बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर या आक्रमक खेळाडूंना या धावा करू दिल्या नाहीत आणि चेन्नईला सलग तिसरा विजय मिळवून दिला. त्यामुळे मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नई आत्मविश्वासानीशी मैदानात उतरेल.

या दोन संघांमध्ये आतापर्यंत २६ सामने झाले आहेत. त्यापैकी १४ सामने मुंबईने तर १२ सामने चेन्नईने जिंकले आहेत. तसेच या दोन संघांमधील मागील पाच सामन्यांपैकी चार सामने रोहित शर्माच्या मुंबईने जिंकले आहेत. त्यामुळे फॉर्मात असलेला चेन्नई संघ या मोसमातील सलग चौथा विजय मिळवतो का की मुंबईचा संघ त्यांना रोखतो हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.

संभाव्य ११ खेळाडू –

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मयांक मार्कंडे/ रसिक सलाम, लसिथ मलिंगा, मिचेल मेकल्यानघन/ जेसन बेहरनडॉर्फ, जसप्रीत बुमराह.

चेन्नई सुपर किंग्स : अंबाती रायडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक/ कर्णधार), ड्वेन ब्रावो, रविंद्र जाडेजा, दीपक चहर, मिचेल सँटनर/ हरभजन सिंग, शार्दूल ठाकूर, इम्रान ताहीर.

मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स
एकूण सामने – २६
मुंबई विजयी – १४
चेन्नई विजयी – १२

First Published on: April 3, 2019 4:01 AM
Exit mobile version