वर्चस्व सिद्ध करण्याचे सिंधूचे लक्ष्य!

वर्चस्व सिद्ध करण्याचे सिंधूचे लक्ष्य!

विश्व विजेत्या पी.व्ही. सिंधूचे मंगळवारपासून सुरू होणार्‍या चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत वर्चस्व सिद्ध करण्याचे लक्ष्य आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणार्‍या सिंधूने मागील महिन्यात स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ही तिची तिसरी वेळ होती. याआधी दोन वेळा तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

जागतिक स्पर्धेआधी सिंधूला या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तिने इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी गाठली होती. जागतिक स्पर्धा जिंकल्यानंतर तिला सराव करण्यासाठी फारसा वेळ मिळालेला नाही. परंतु, आता तिचे चीन ओपनचे जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य असेल. तिने याआधी २०१६ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. सिंधूचा या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत चीनच्या माजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ली शुइरुईशी सामना होईल. सिंधूने २०१२ साली चीन मास्टर्स स्पर्धेत लीचा पराभव करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली होती. त्यानंतर सिंधूने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, तर ली हिला रिओ ऑलिम्पिकपासून पायाच्या दुखापतीने सतावले आहे. जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानी असणार्‍या ली आणि सिंधू यांच्यात आतापर्यंत ६ सामने झाले असून दोघींनाही ३-३ सामने जिंकण्यात यश आले आहे. सिंधूने सुरुवातीचे काही सामने जिंकल्यास तिचा उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या तिसर्‍या सीडेड चेन युफेईशी सामना होऊ शकेल.

दुसरीकडे जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असणार्‍या सायना नेहवालचाही या स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. सायनाला या मोसमात दुखापतींनी ग्रासले आहे. जागतिक स्पर्धेची चांगली सुरुवात केल्यानंतर पंचांच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे सायनाला दुसर्‍या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सायनासमोर थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानचे आव्हान आहे. पुरुषांमध्ये किदाम्बी श्रीकांतला दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे सर्वांची नजर साई प्रणितच्या कामगिरीकडे असेल. तसेच पारुपल्ली कश्यपचा पहिल्या फेरीत फ्रान्सच्या ब्राइस लेव्हरडेझशी सामना होईल.

कॅरोलिना मरीनचे पुनरागमन

चीन ओपन ही वर्ल्ड टूर मोसमातील शेवटची सुपर १००० स्पर्धा आहे. या स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या आणि तीन वेळच्या विश्व विजेत्या कॅरोलिना मरीनचे पुनरागमन होणार आहे. मरीनला दुखापतीमुळे काही काळ बॅडमिंटन कोर्टबाहेर रहावे लागले होते. ती जागतिक स्पर्धेलाही मुकली होती. तसेच पुरुषांमध्ये २०१७ साली जागतिक स्पर्धा जिंकणारा डेन्मार्कचा व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनही पुनरागमन करणार आहे.

First Published on: September 17, 2019 2:21 AM
Exit mobile version