आम्ही वर्ल्डकप जिंकलो, पण…

आम्ही वर्ल्डकप जिंकलो, पण…

Morgan

आम्ही विश्वचषक जिंकलो, पण अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये काहीच फरक नसल्याने हा निर्णय योग्य होता का असा प्रश्न पडतो, असे विधान इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने केले. मागील रविवारी इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघामध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना लॉर्ड्सवर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडलाही २४१ धावाच करता आल्या. नियमित सामन्यात बरोबरी असल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यामध्ये दोन्ही संघांनी १५-१५ धावाच केल्या. मात्र, इंग्लंडने सर्वाधिक चौकार-षटकार लगावल्याने त्यांना या सामन्याचा विजेता घोषित करण्यात आले आणि त्यांनी पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. सर्वाधिक चौकार-षटकार लगवल्यामुळे एखादा संघ विजयी होणे, या नियमामुळे आयसीसीवर बरीच टीका झाली. अंतिम सामना संपल्यावर आम्ही या नियमांबाबत काहीही करू शकत नाही, असे मॉर्गन म्हणाला होता. मात्र, आता इंग्लंडने योग्य पद्धतीने विश्वचषक जिंकला का असा त्याला प्रश्न पडला आहे.

अंतिम सामन्याचा निकाल योग्य होता असे मला वाटत नाही. या सामन्यात आम्ही आणि न्यूझीलंडने केलेल्या कामगिरीत काहीच फरक नव्हता. त्यामुळे आम्ही हा सामना जिंकल्याबाबत मी खूप खुश आहे असे म्हणणार नाही. तुम्ही या सामन्यात कोणत्या एका संघाने दुसर्‍या संघापेक्षा चांगला खेळ केला असे म्हणू शकणार नाही. या सामन्यात एकही असा क्षण नव्हता जेव्हा तुम्ही सांगू शकता की एका संघाने हा सामना खर्‍या अर्थाने जिंकला. त्यामुळे आम्ही हा सामना खरच जिंकला का, असे प्रश्न मला पडला आहे. मात्र, पराभूत झालेल्या संघाला जास्त दुःख झाले असेल हे नक्की. या सामन्यात कोणीही विजेता नव्हता, असे मॉर्गन म्हणाला.

तसेच मी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनशी संवाद साधत आहे, असे मॉर्गन स्पष्ट केले. मी अंतिम सामन्यानंतरचे दोन-तीन दिवस केनसोबत चर्चा केली. त्यांनी आम्हाला सर्वोत्तम खेळ करायला लावला आणि आम्ही त्यांना. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये काहीच फरक नव्हता. त्यामुळे त्याच्यासाठी आपला संघ पराभूत झाला हे स्वीकारणे खूप अवघड जात आहे.

First Published on: July 22, 2019 4:26 AM
Exit mobile version