शिखर धवन आऊट!

शिखर धवन आऊट!

शिखर धवन

भारताचा सलामीवीर शिखर धवन डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही. रविवारी बंगळुरूत झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना धवनला ही दुखापत झाली. धवनला मागील काही महिन्यांत दुखापतींनी सतावले आहे. अंगठ्याच्या दुखापतीमुळे त्याला मागील वर्षी झालेल्या विश्वचषकात केवळ २ सामने खेळता आले. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली करंडकात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यातून फिट झाल्यानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले, पण आता पुन्हा जायबंदी झाल्यामुळे त्याला न्यूझीलंड दौर्‍यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला मुकावे लागणार आहे.

धवन टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी लवकरच बदली खेळाडूची निवड केली जाईल, असे बीसीसीआयच्या अधिकार्‍याने सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील पाचव्या षटकात अ‍ॅरॉन फिंचने मारलेला फटका अडवताना धवनच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याचा एक्स-रे काढण्यात आला. या दुखापतीमुळे त्याने उर्वरित डावात क्षेत्ररक्षण केले नाही. तसेच त्याला फलंदाजीही करता आली नाही. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत लोकेश राहुलने भारताच्या डावाची सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी धवनच्या संघातील स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, त्याने पहिल्या दोन सामन्यांत ९६ आणि ७४ धावांची खेळी करत टीकाकारांची तोंडे बंद केली.

पृथ्वीला मिळणार संधी?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला २४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. शिखर धवनला या दोन्ही मालिकांना मुकावे लागल्यास संजू सॅमसन, पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल आणि शुभमन गिल यांच्यापैकी एकाची भारतीय संघात निवड होऊ शकेल. हे चौघेही सध्या न्यूझीलंडमध्ये भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गिलने मागील वर्षी न्यूझीलंडमध्येच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर पृथ्वीने काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध सराव सामन्यात १०० चेंडूत १५० धावांची खेळी करत आपण फॉर्मात असल्याचे दाखवून दिले आहे.

ईशांत कसोटी मालिकेला मुकणार?

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला सोमवारी विदर्भाविरुद्धच्या रणजी सामन्यात गोलंदाजी करताना पायाच्या घोट्याला दुखापत झाली. विदर्भाच्या डावातील पाचवे षटक टाकताना ईशांतचा पाय मुरगळला आणि सूज आली. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. ईशांतच्या पायाला फ्रॅक्चर नाही. मात्र, त्याला सहा आठवड्यांची विश्रांती सांगितली आहे. तो आता पुढील उपचारांसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होईल, असे डीडीसीएचे सरचिटणीस विनोद तिहारा यांनी सांगितले. २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार्‍या कसोटी मालिकेसाठी ईशांतच्या जागी नवदीप सैनीला संघात स्थान मिळू शकेल.

First Published on: January 22, 2020 5:55 AM
Exit mobile version