धोनीबाबतचा निर्णय आयपीएलनंतरच!

धोनीबाबतचा निर्णय आयपीएलनंतरच!

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी इंग्लंडमध्ये जुलैत झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र, ३८ वर्षीय धोनीने अजून निवृत्तीची घोषणाही केलेली नाही. त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत सतत चर्चा सुरु असते. भारतीय संघ भविष्याचा विचार करत युवा रिषभ पंतला जास्तीतजास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, त्याला अजून या संधीचे सोने करता आलेले नाही. त्यातच धोनीने काही दिवसांपूर्वीच पुन्हा सरावाला सुरुवात केली. त्यामुळे त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, धोनीबाबतचा अंतिम निर्णय पुढील वर्षीच्या आयपीएलनंतरच घेतला जाईल, अशी माहिती भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली.

धोनीचे भारतीय संघात पुनरागमन होणार का, हे तो कधी पुन्हा खेळण्यास सुरुवात करतो आणि तो पुढील आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो यावर ठरेल. तसेच इतर यष्टीरक्षक कशी कामगिरी करत आहेत आणि धोनी चांगल्या फॉर्मात आहे का, हेसुद्धा पाहावे लागेल. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. त्याआधी आयपीएल स्पर्धा होईल. त्यामुळे या स्पर्धेचे महत्त्व अधिक वाढले आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आम्ही विश्वचषकासाठीच्या १५ सदस्यीय संघ निवडू शकतो. एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास तो संघातील स्थान गमावू शकेल. त्यामुळे तुम्ही आता अंदाज बांधणे थांबवा. आयपीएल स्पर्धा संपेपर्यंत वाट पाहा. त्यानंतर तुम्हाला देशातील सर्वोत्तम १७ टी-२० खेळाडू माहित होतील, असे शास्त्री म्हणाले.

भारतीय संघाला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने पराभूत केले होते. तो पराभव पचवणे अवघड होते, पण भारताच्या खेळाडूंनी त्यानंतर ज्याप्रकारे कामगिरी केली आहे त्याचा शास्त्रींना अभिमान आहे. मँचेस्टरमधील त्या सामन्यात झालेला पराभव पचवणे आमच्यासाठी अवघड होते. आमचे सर्व खेळाडू खूप दुःखी होते. मात्र, त्यानंतर मागील तीन महिन्यांत आमच्या संघाने केलेली कामगिरी फारच उत्कृष्ट आहे. आमच्या संघाने मागील ५-६ वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे हा संघ भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे असे म्हणता येईल.

पंतला अजून शिकण्याची गरज!

युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला मागील काही काळात चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याच्यावरील दबाव वाढत चालला आहे. त्याला तुम्ही काय सल्ला दिला आहे असे विचारले असता भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले, मी त्याला फार काही सांगितले नाही. तू युवा खेळाडू आहेस आणि तू एकाच दिवसात सर्व शिकशील अशी कोणाला अपेक्षा नाही. मात्र, तुला अजून खूप शिकायचे आहे. तू चुका करणारच आहेस, पण त्याच-त्याच चुका पुन्हा होणार नाहीत याची तू काळजी घेतली पाहिजेस. तुला बर्‍याच चढ-उतारांचा सामना करावा लागेल. मात्र, तू जितकी मेहनत घेशील, तितकी तुझ्या खेळात सुधारणा होईल, असे मी पंतला सांगितले.

First Published on: November 27, 2019 5:35 AM
Exit mobile version