IND vs AUS : वृद्धिमान साहाला संघाबाहेर काढण्याची घाई नको – ओझा 

IND vs AUS : वृद्धिमान साहाला संघाबाहेर काढण्याची घाई नको – ओझा 

वृद्धिमान साहा

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करता आला नाही. साहा फलंदाजीत दोन डावांत मिळून केवळ १३ धावा करू शकला, तसेच यष्टिरक्षणात त्याने एकही झेल पकडला नाही. साहाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात ४ कसोटी सामने खेळले असून त्याला एकही अर्धशतक करता आलेले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांत भारतीय संघाने साहाच्या जागी रिषभ पंतला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संधी दिली पाहिजे असे क्रिकेट समीक्षकांना वाटत आहे. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा या मताशी सहमत नाही.

रिषभ पंत चांगला फलंदाज आहे आणि म्हणूनच त्याला पहिल्या कसोटीत संधी मिळेल असे मला वाटले होते. गुलाबी चेंडूविरुद्ध पंत बहुधा अधिक धावा करू शकला असता. मात्र, आता ३६ वर्षीय साहाचा विचार झाला पाहिजे. त्याचे वय लक्षात घेता केवळ एका कसोटीनंतर संघाबाहेर काढल्यास, त्याला संघात पुनरागमन करणे फार अवघड होईल. त्यामुळे त्याला किमान आणखी एका सामन्यात संधी दिली पाहिजे. साहा अजूनही भारतीय कसोटी संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे त्याला आणखी एक संधी मिळाली पाहिजे, असे ओझाने नमूद केले. साहाने ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात अर्धशतक केल्याने भारताचा पराभव टळला होता.

First Published on: December 23, 2020 8:39 PM
Exit mobile version