डॉ. पाटील यांचा आरोग्यमंत्र; डोंबिवलीकरांसाठी ठरतोय प्रेरणादायी!

डॉ. पाटील यांचा आरोग्यमंत्र; डोंबिवलीकरांसाठी ठरतोय प्रेरणादायी!

आपल्या समाजाचे आणि शहराचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने धावले पाहिजे. आपल्या शरीराला थोडा व्यायाम दिला, तर आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहू हा संदेशच आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवून इतरांनीही आपल्यासारखी आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी डोंबिवलीतील डॉ. शोभा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. धावण्यासोबतच मॅरेथॉन शर्यतीत भाग घेऊन आपले आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याचे काम डॉ. पाटील आपल्या क्लिनिकच्या माध्यमातून करत आहेत. धावणे, मॅरेथॉन, मॉर्निंग वॉक या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी कशा फायदेशीर आहेत, हे डॉ. पाटील त्यांच्याकडे येणार्‍या सर्व पेशंटना समजावून सांगतात. विविध मॅरेथॉनमध्ये मिळवलेली पदके, प्रमाणपत्र, चषके त्यांनी आपल्या क्लिनिकमध्ये लावून ठेवली आहेत. त्यांच्या क्लिनिकमध्ये येणार्‍या प्रत्येकाची नजर या गोष्टींवर पडतेच.

४६ वर्षीय डॉ. पाटील यांनी यंदाच्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत त्यांच्या वयोगटात १० किलोमीटर शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावून डोंबिवली शहराचे नावलौकिक वाढवले. डॉ. पाटील यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून धावण्यास सुरुवात केली आणि विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदके पटकावली. सुरुवातीला आठवड्यातून केवळ दोन वेळा एक तास धावायचा सराव करणार्‍या डॉ. पाटील यांना पुढे मॅरेथॉन प्रशिक्षक सुहास भोपी, डॉ. अजित ओक, जगदिश गावडे या सर्वांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तसेच त्या नियमित सराव करतात ना, याकडे त्यांचे पती डॉ. राजकुमार विशेष लक्ष देत आहेत.

आतापर्यंत डॉ. पाटील यांनी ९० मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. ५, १०, १५, २१, २५ किलोमीटर्स आणि सहा तास नाईट रन अशा विविध प्रकारच्या मॅरेथॉन, तसेच तीन वेळा स्टेडियम रन त्या धावल्या आहेत. डोंबिवली, दमण, औरंगाबाद, सातारा, पुणे, नागपूर, लोणावळा येथे झालेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्यांनी ४० वेळा विविध पदके मिळवली आहेत. तसेच त्या मिलिंद सोमण यांच्या पिंकथॉनच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. पिंपरी, भोसरी, पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय मास्टर्स गेममध्ये त्यांना दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवण्यात त्यांना यश आले आहे. याच वर्षी ४ फेब्रुवारीला वडोदरा येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्समध्ये डॉ. पाटील यांनी ५ किमी स्पर्धेत सुवर्ण, १५०० मी. स्पर्धेत रौप्य आणि ८०० मी. शर्यतीत कांस्यपदक मिळवले. त्यामुळे जपान येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.

स्वतः डॉक्टर असल्यामुळे आपले आरोग्य उत्तम असावे यासाठी तुम्ही धावावे किंवा व्यायाम तरी करावा, असा संदेश त्या सर्वांना देतात. त्यांनी डोंबिवलीत रन डोंबिवली रन ही पुरुषांसाठी आणि रणरागिणी ही महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा सुरू केली आहे. त्यांच्या क्लिनिकमधील पदके, प्रमाणपत्र, चषके बघून इतरांना प्रोत्साहन मिळते. मात्र, डॉक्टर असल्यामुळे त्यांचे व्यस्त वेळापत्रक असते. मग “क्लिनिक, घर सांभाळून तुम्ही धावण्यासाठी कसा वेळ काढता?”, असा प्रश्न सर्वच त्यांना विचारतात. यावर त्या म्हणतात, “सकाळी लवकर उठल्यास वेळ आपोआपच मिळतो. धावायला किंवा चालायला जा. सकारात्मक विचार करा.”

– अविनाश ओंबासे

First Published on: March 7, 2020 2:36 AM
Exit mobile version