आठ वर्षांनंतर मुंबई इंडियन्स मोहालीत पराभूत

आठ वर्षांनंतर मुंबई इंडियन्स मोहालीत पराभूत

राहुल-गेल-मयांकच्या खेळीने पंजाबचा विजय

ख्रिस गेलची दमदार सुुरूवात आणि त्यानंतर लोकेश राहुल , मयांक अग्रवाल यांनी केलेल्या खेळीने किंग्स इलेव्हन पंजाबने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सवर 8 गडी राखून विजय मिळवला.विशेष म्हणजे 2011 पासून मुंबई इंडियन्स मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर एकदाही पराभूत झालेला नव्हता त्यांनी येथे खेळलेले चारही सामने जिंकले होते. पण, शनिवारी त्यांची ही विजयी मालिका खंडित झाली. आठ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सला मोहालीत पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबईकडून क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय मुंबई इंडियन्सच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही. किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना मुंबईला 20 षटकांत 7 बाद 176 धावांपर्यंत मजल मारू दिली. लोकल बॉय युवराज सिंगही फार करिष्मा करू शकला नाही. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले. कृणाल पांड्या व हार्दिक पांड्या यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना मुंबई इंडियन्सला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिक पांड्याने 19 चेंडूंत 31 धावा चोपल्या. रोहितने 19 चेंडूंत 5 चौकारांसह 32 धावा केल्या. डी कॉकने 39 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 60 धावा केल्या.

पंजाबने आपल्या डावाची सुरूवात उत्तम केली. गेलच्या फटकेबाजीनंतरही किंग्स इलेव्हन पंजाबला पॉवर प्लेमध्ये केवळ 38 धावा करता आल्या. हार्दिक पांड्याच्या पहिल्याच षटकात पंजाबच्या ख्रिस गेलने दोन खणखणीत षटकार खेचले. त्यामुळे पांड्या किंचितसा दडपणात आलेला पाहायला मिळाला. हार्दिक पांड्याला दोन खणखणीत षटकार खेचणार्‍या गेलला कृणाल पांड्याने बाद केले. आठव्या षटकात कृणालच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात गेल हार्दिकच्या हाती झेल देऊन बसला. गेलची कॅच पकडताच हार्दिकने मैदानावर डान्स केला.

कृणाल पांड्याने पंजाबला आणखी एक हादरा दिला. लोकेश राहुल व मयांक अग्रवाल ही जोडी त्याने फोडली. कृणालने 14व्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर मयांकला झेलबाद केले. मयांकने 21 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 43 धावा केल्या. राहुल खिंड लढवत होता. राहुलने 46 चेंडूंत 1 षटकार व 3 चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. राहुलला डेव्हिड मिलरची उत्तम साथ लाभली आणि त्याच्या जोरावर पंजाबने विजय मिळवला. राहुल आणि मिलरने अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी 30 चेंडूंत 50 धाव जोडल्या.

First Published on: March 31, 2019 4:03 AM
Exit mobile version