IND vs ENG : इंग्लंडच्या अडचणीत वाढ; कर्णधार उर्वरित वनडे मालिकेला मुकणार 

IND vs ENG : इंग्लंडच्या अडचणीत वाढ; कर्णधार उर्वरित वनडे मालिकेला मुकणार 

इयॉन मॉर्गन

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी खेळला जाणार आहे. मात्र, त्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गन हाताला झालेल्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांना मुकणार असल्याचे समजते. मॉर्गनने गुरुवारी क्षेत्ररक्षणाचा सराव केला. मात्र, त्याला त्रास जाणवल्याने त्याने उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे. तसेच सॅम बिलिंग्सही दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. मॉर्गनच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक-फलंदाज जॉस बटलर इंग्लंडचे नेतृत्व करेल. तर लियम लिविंगस्टनला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकेल. इंग्लंडकडे मधल्या फळीतील फलंदाज म्हणून लिविंगस्टन आणि डाविड मलानचा पर्याय आहे.

क्षेत्ररक्षण करताना उजव्या हाताला दुखापत

मंगळवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना झाला. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना मॉर्गनच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या हाताला चार टाकेही घालावे लागले. असे असले तरी त्याने फलंदाजीसाठी मैदानात येत २२ धावांची खेळी केली होती. मात्र, इंग्लंडने तो सामना ६६ धावांनी गमावला. आता त्याला उर्वरित दोन सामन्यांत खेळता येणार नाही. इंग्लंडला आधीच जो रूटची उणीव भासत असून मॉर्गन उर्वरित दोन सामन्यांना मुकणे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

First Published on: March 25, 2021 10:08 PM
Exit mobile version