IND vs ENG : इंग्लंडने सावध राहावे, भारतीय संघ पुनरागमन करेल – नासिर हुसेन

IND vs ENG : इंग्लंडने सावध राहावे, भारतीय संघ पुनरागमन करेल – नासिर हुसेन

विराट कोहली, जो रूट, नासिर हुसेन

इंग्लंडने पहिल्या कसोटीत उत्कृष्ट खेळ करत यजमान भारताला सहजपणे पराभूत केले. मात्र, भारतीय संघ पुनरागमन करण्यास उत्सुक असेल. त्यामुळे इंग्लंडने सावध राहण्याची गरज आहे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने व्यक्त केले. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला चेन्नई येथेच शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीचा भारतीय संघ त्यांचा खेळ नक्कीच उंचावेल असे नासिरला वाटते.

इंग्लंडने लोकांना चुकीचे ठरवले

भारतात खेळणे आणि कसोटी सामना जिंकणे फार अवघड असते. त्यातच भारतीय संघ चांगल्या फॉर्मात होता. त्यांनी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. विराट कोहलीचेही संघात पुनरागमन झाले. त्यामुळे इंग्लंडचा संघ भारतात एकही कसोटी सामना जिंकणार नाही असे अनेकांना वाटत होते. मात्र, पहिल्या कसोटीत इंग्लंडने लोकांना चुकीचे ठरवले. चेन्नईतील विजय हा इंग्लंडचा सर्वोत्कृष्ट विजयांपैकी एक होता, असे नासिर म्हणाला.

भारतीय संघ खेळ उंचावेल

इंग्लंडने आता सावध राहणे गरजेचे आहे, कारण भारतीय संघ दमदार पुनरागमन करण्यास उत्सुक असेल. ऑस्ट्रेलियातही भारताने पहिली कसोटी गमावली होती. या सामन्यात त्यांचा दुसरा डाव केवळ ३६ धावांत आटोपला होता. मात्र, त्यांनी पुनरागमन केले आणि ती कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ त्यांचा खेळ उंचावेल. इंग्लंडने चांगला खेळ करत राहणे गरजेचे आहे, असेही नासिरने नमूद केले.


हेही वाचा – WTC : भारताची चौथ्या स्थानी घसरण


 

First Published on: February 10, 2021 6:40 PM
Exit mobile version