यजमान इंग्लंडच वर्ल्डकपचे प्रमुख दावेदार

यजमान इंग्लंडच वर्ल्डकपचे प्रमुख दावेदार

अ‍ॅलिस्टर कूकचे मत

इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कूकच्या मते यजमान इंग्लंड संघच मे महिन्यात सुरु होणार्‍या क्रिकेट विश्वचषकाचा प्रमुख दावेदार आहे. इंग्लंडच्या संघाला २०१५ विश्वचषकात बाद फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे त्यानंतर इंग्लंडने नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याने इयॉन मॉर्गनची कर्णधार म्हणून निवड केली. या बदलांमुळे इंग्लंडचे प्रदर्शनही सुधारले आहे. इंग्लंड सध्याच्या घडीला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक म्हणून ओळखला जातो. इंग्लंडने मागील विश्वचषकानंतर आपल्या घरच्या मैदानावर ४२ पैकी ३० सामने जिंकले आहेत. हा विश्वचषकही इंग्लंडमध्येच होणार आहे. त्यामुळेच इंग्लंडला हा विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे असे कूक म्हणाला.

इंग्लंडला खूप चांगली संधी आहे. ही अशी बहुतेक पहिलीच वेळ आहे, जेव्हा विश्वचषकाआधी इंग्लंड संघ संतुलित आहे आणि या संघात कोण खेळणार हे आधीपासून ठाऊक आहे. सर्वोत्तम संघ बनण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते, त्या सर्व गोष्टी या संघात आहेत, असे कूक म्हणाला.

इंग्लंडला २०१७ मध्ये इंग्लंडमध्येच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकण्याचेही प्रमुख दावेदार मानले जात होते, मात्र त्यांचा उपांत्य फेरीत पाकिस्तानने पराभव केला होता. या पराभवाचा इंग्लंडला फायदाच होईल असे कूकला वाटते. याबाबत तो म्हणाला, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीत त्यांचा उपांत्य फेरीत पाकिस्तानने पराभव केला हे खरे असले तरी याचा त्यांना फायदाच झाला असेल. तुम्हाला संघ म्हणून परिपक्व होण्यासाठी अशा पराभवांची गरज असते. हा विश्वचषक जिंकण्याचे तेच प्रमुख दावेदार आहेत. मॉर्गनच्या या संघात असे बरेच खेळाडू आहेत, जे आपल्या दिवशी एकटेच सामना जिंकवून देऊ शकतात.

पुनरागमनाचा विचार नाही, पण…

अ‍ॅलिस्टर कूकने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतरही तो कौंटी क्रिकेटमध्ये खेळत आहे. तो निवृत्त झाल्यानंतर इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये रोरी बर्न्स, किटन जेनिंग्स, जो डेंली या खेळाडूंना सलामी करण्याची संधी दिली आहे, मात्र एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे कूकने पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याबाबत विचार केला पाहिजे असे काही क्रिकेट समीक्षकांचे मत आहे. याबाबत तो म्हणाला, मी इंग्लंडसाठी अखेरचा सामना खेळलो आहे. त्यामुळे मी पुनरागमनाचा विचार करत नाही, पण संघाला कधी गरज लागलीच तर मी खेळण्याचा विचार करेन. मी १२ वर्षे इंग्लंडसाठी खेळलो. आता मला वाटते की युवा खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे.

First Published on: April 4, 2019 4:09 AM
Exit mobile version