दोन संघांतील तफावत चिंताजनक!

दोन संघांतील तफावत चिंताजनक!

मोमिनुल हकचे उद्गार

विराट कोहलीचा भारतीय संघ सध्या कसोटी क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखला जातो. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी या संघाने घरच्या मैदानावर सलग अकरा कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यातच शाकिब अल हसन आणि तमिम इक्बाल हे बांगलादेशचे प्रमुख खेळाडू भारताविरुद्ध मालिकेत खेळले नाही.

मात्र, बांगलादेशचा संघ दोन सामन्यांच्या या मालिकेत भारताला झुंज देईल अशी आशा केली जात होती, पण तसे झाले नाही. या मालिकेच्या चार डावांपैकी केवळ एका डावात बांगलादेशला २०० धावांचा टप्पा पार करता आला. त्यामुळे भारत आणि आमच्या संघात असलेली तफावत चिंताजनक आहे, असे मत बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकने व्यक्त केले.

दोन संघांमधील तफावत चिंताजनक आहे. भारताने या मालिकेत फारच उत्कृष्ट खेळ केला. आम्हाला या दोन सामन्यांतून खूप शिकायला मिळाले आणि या मालिकेतील चुका पुन्हा करणे आमच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. गुलाबी आणि नव्या चेंडूविरुद्ध खेळणे आव्हानात्मक होते. आम्ही ही मालिका गमावली असली तरी आम्ही काही चांगल्या गोष्टीही केल्या. इबादतने चांगली गोलंदाजी केली. फलंदाजीत मुशफिकूर आणि महमदुल्लाह यांनी भारतीय गोलंदाजांना झुंज दिली, असे मोमिनुलने सांगितले.

First Published on: November 25, 2019 5:47 AM
Exit mobile version