सचिन, युवी पुन्हा मैदानात!

सचिन, युवी पुन्हा मैदानात!

सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पॉटींग आणि युवराज सिंह दिसणार एकत्र खेळताना

ऑस्ट्रेलियामध्ये काही महिन्यांपूर्वी लागलेल्या वणव्यात हजारो प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला, २००० घरे उध्वस्थ झाली आणि २९ लोक मृत पावले आहेत. या पीडितांना मदत करण्यासाठी रविवारी एका प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा आपल्या आवडत्या माजी क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी मिळाली. या सामन्यातून पीडितांसाठी ७.७ मिनियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतकी रक्कम गोळा करण्यात आली.

१०-१० षटकांच्या या सामन्यात पॉन्टिंग इलेव्हन संघाने गिलक्रिस्ट इलेव्हन संघावर एका धावेने मात केली. पॉन्टिंग इलेव्हन संघाने कर्णधार पॉन्टिंग (२६) आणि विंडीजचा महान खेळाडू ब्रायन लाराच्या (३०) अप्रतिम फलंदाजीमुळे १० षटकांत ५ बाद १०४ धावा केल्या. गिलक्रिस्ट संघाकडून खेळणार्‍या युवराज सिंगने १ गडी बाद केला. याचा पाठलाग करताना गिलक्रिस्ट इलेव्हनने १० षटकांत ६ बाद १०३ धावा केल्याने त्यांचा पराभव झाला. गिलक्रिस्ट संघाच्या शेन वॉटसन (३०) आणि अँड्र्यू सायमंड्स (२९) यांनी चांगली फलंदाजी केली.

पाच वर्षांत पहिल्यांदा फलंदाजी!
दोन डावांमधील विश्रांतीच्या वेळी जगभरातील क्रिकेट चाहत्यांना भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहण्याची संधी मिळाली. त्याने ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरीविरुद्ध फलंदाजी केली. पाच वर्षांत पहिल्यांदाच मी बॅट हातात घेतली आहे, असे सचिनने फलंदाजीला जाण्यापूर्वी सांगितले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला.

First Published on: February 10, 2020 3:17 AM
Exit mobile version