कुटुंबासाठीच सारे काही !

कुटुंबासाठीच सारे काही !

दीपक निवास हुडा

प्रो-कबड्डी २०१४ मध्ये सुरु झाले. प्रो-कबड्डीने कबड्डीपटूंना नवी ओळख मिळवून दिली. त्याचप्रमाणे या लीगमुळे कबड्डीपटू आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले. यावर्षीच्या खेळाडू ‘ऑक्शन’ मध्ये ६ खेळाडूंना १ करोडहून जास्त रक्कम मिळाली. त्यातलाच एक होता दीपक निवास हुडा. हुडाला १.१५ करोड रुपये देत जयपूर पिंक पॅन्थरने आपल्या संघात घेतले. पण दीपकचा इथवरच प्रवास सोपा नव्हता. दीपकची आई लहानपणीच वारली. तर वडील तो बारावीत असताना वारले. त्यामुळे बहिणीची आणि तिच्या दोन मुलांची जबाबदारी त्याच्यावर आली. त्यामुळे त्याने आपल्या इंजिनिअर बनण्याच्या स्वप्नाला मुरड घातली.

बारावीत गेल्यानंतर कबड्डी खेळण्यास सुरुवात

याविषीयी हुडा म्हणाला, “मला इंजिनिअर बनायचे होते. पण परिस्थितीमुळे मला या स्वप्नाला मुरड घालावी लागली. मग कुटुंबासाठी मी एका शाळेत नोकरी करू लागलो आणि तिथेच मला कबड्डीमध्ये रुची निर्माण झाली. मी त्यावेळी विचार केला की जर मला खेळांतच एखादी नोकरी मिळाली तर मी माझ्या कुटुंबाला चांगले आयुष्य देऊ शकेन. तेव्हापासून मी कबड्डीचा गांभीर्याने सराव करण्यास सुरुवात केली. बाकी खेळाडू अगदी लहान वयापासून खेळतात. पण मी बारावीत गेल्यानंतर कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीला मला संघात येण्यासाठी बरीच धडपड करावी लागली. त्यातच मला घरही चालवायचे होते. त्यामुळे शाळेतील नोकरी आणि कबड्डीचा सराव यांची सांगड घालण्यासाठी मला बरेच कष्ट घ्यावे लागले. पण या कष्टांचे आज चीज झाले आहे.”
प्रो-कबड्डीच्या या मोसमात जयपूर संघाला चांगले प्रदर्शन करता आले नसले तरी हुडाने चमकदार कामगिरी केली आहे. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो बाराव्या स्थानी आहे.
First Published on: November 14, 2018 3:00 AM
Exit mobile version