अजय जडेजाला एक चूक पडली महागात; भरावा लागला हजारोंचा दंड

अजय जडेजाला एक चूक पडली महागात; भरावा लागला हजारोंचा दंड

माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने गोव्यात भरला ५००० रूपयांचा दंड!

भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाला एक चूक महागात पडली आहे. अजय जडेजा सध्या गोव्यात असून त्याला रस्त्यावर कचरा फेकण्याची चूक चांगलीच महागात पडली. अजय जडेजाने गोव्यातील निचोनाला गावात रस्त्यावर कचरा फेकल्याने त्याला ५ हजारांचा दंड भरावा लागला. ही घटना २८ जूनला घडली. या संदर्भातील माहिती निचोनाला गावच्या सरपंच तृप्ती बांदोडकर यांनी दिली.

अजय जडेजाचा उत्तर गोव्यातील अल्डोना गावात बंगला आहे. त्याच्या बंगल्याच्या शेजारीच निचोनाला गाव आहे. गावच्या सरपंच तृप्ती बांदोडकर यांनी सांगितलं की, गावात बाहेरुन येणारे कचरा फेकतात, यामुळे गावकरी त्रस्त आहेत. गावातील कचरा गोळा करण्यासाठी आणि दोषींना पकडण्यासाठी पुरावे गोळा करण्यासाठी काही युवकांची नेमणूक केली आहे. दरम्यान, या युवकांनी नेहमी प्रमाणे कचरा गोळा केला.

“गोळा केलेल्या कचऱ्यात अजय जडेजाच्या नावे असलेली काही बिलं आम्हाला सापडली. तेव्हा आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि गावात कचरा फेकू नका असं सांगितलं. तेव्हा जडेजानं जो काही दंड आहे, तो भरण्याची तयारी दाखवली. त्यानुसार जडेजाने दंड भरला. आमच्या गावात सेलिब्रेटी राहतात याचा आम्हाला अभिमान आहे, परंतु त्यांनी नियमांचं पालन करायला हवं,” असं तृप्ती बांदोडकर म्हणाल्या.

अजय जडेजाची कारकीर्द

अजय जडेजाने १५ कसोटी समाने खेळले असून ५७६ धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. तर जडेजाने १९६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात ५ हजार ३५९ धावा केल्या आहेत. ३० अर्धशतक आणि ६ शतकांचा समावेश आहे.

 

First Published on: June 30, 2021 11:57 AM
Exit mobile version