फ्रान्सच्या विजयात जिरुड चमकला

फ्रान्सच्या विजयात जिरुड चमकला

सौजन्य - Mirror

फ्रान्सने रशियात पार पडलेला फुटबॉल विश्वचषक २०१८ आपल्या नावे केला होता. २०१८ फुटबॉल विश्वचषक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानात खेळणाऱ्या फ्रान्सने युएफा नेशन्स लीग स्पर्धेच्या सामन्यात नेदरलँड्सवर २-१ अशी मात केली.

जिरूडचा विजयी गोल 

या सामन्याची सुरूवात फ्रान्सने अगदी आक्रमक केली. त्यांचे आघाडीचे खेळाडू किलियन एम्बापे, अँटोन ग्रीझमन आणि ओलिव्हिएर जिरुड यांनी नेदरलँड्सच्या बचावफळीवर दबाव टाकला. याचा फायदा त्यांना १४ व्या मिनिटाला मिळाला. त्यांचा अप्रतिम युवा खेळाडू किलियन एम्बापेने गोल करत फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. नेदरलँड्सला २०१८ विश्वचषकात स्थान मिळवता आले नव्हते. त्यामुळे त्यांनी युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला. या काही नव्या आणि जुन्या खेळाडूंनी सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण मध्यंतरापर्यंत त्यांना गोल करण्यात अपयश आले. मध्यंतरानंतर नेदरलँड्सने चांगली सुरूवात केली. ६७ व्या मिनिटाला रायन बाबलने गोल करत नेदरलँड्सला बरोबरी करून दिली. पण ही बरोबरी त्यांना अवघे सातच मिनिटे ठेवता आली. ७४ व्या मिनिटाला ओलिव्हिएर जिरुडने गोल करत फ्रान्सला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी सामना संपेपर्यंत ठेवल्याने त्यांनी हा सामना जिंकला.

जिरूडचा खास गोल 

फ्रान्सने २०१८ विश्वचषक जिंकला. या पूर्ण स्पर्धेत ओलिव्हिएर जिरुडला गोल करता आला नव्हता. त्यामुळे त्याच्यासाठी हा गोल खास होता. तसेच जिरुडने केलेला हा गोल त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दतील ३२ वा गोल होता. या गोलमुळे तो फ्रान्ससाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

 

First Published on: September 10, 2018 9:01 PM
Exit mobile version